दोन अस्वलांची शिकार प्रकरण, चार आरोपींना अटक; पाच दिवसांची वन कोठडी

By गोपालकृष्ण मांडवकर | Published: February 24, 2024 08:51 PM2024-02-24T20:51:23+5:302024-02-24T20:52:22+5:30

अटकेतील आरोपींमध्ये अश्विन देशमुख (३८), मंगेश चचाणे (३५), रूपचंद शेंडे (३२) आणि रमेश रोहणकर (४८) यांचा समावेश आहे. ते सर्वजण नान्होरी (ता. लाखनी) येथील रहिवासी आहेत.

Two bear poaching cases, four accused arrested; Five days of forest detention | दोन अस्वलांची शिकार प्रकरण, चार आरोपींना अटक; पाच दिवसांची वन कोठडी

दोन अस्वलांची शिकार प्रकरण, चार आरोपींना अटक; पाच दिवसांची वन कोठडी

भंडारा : लाखनी वनपरिक्षेत्रा अंतर्गत सहवनक्षेत्रालगतच्या रामपुरी गावाच्या शेतशिवारात दोन नर अस्वलांचा विजेच्या सापळ्यात अडकल्याने मृत्यू झाला होता. या प्रकरणी चार आरोपींना अटक करून त्यांची वन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. अटकेतील आरोपींमध्ये अश्विन देशमुख (३८), मंगेश चचाणे (३५), रूपचंद शेंडे (३२) आणि रमेश रोहणकर (४८) यांचा समावेश आहे. ते सर्वजण नान्होरी (ता. लाखनी) येथील रहिवासी आहेत.

१८ फेब्रुवारीच्या सकाळी या शेतशिवारात दोन अस्वल मृतावस्थेत आढळले होते. वन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ६ दिवसांपूर्वी रामपुरी येथील शेतशिवारात दोन्ही अस्वलांना विजेचा प्रवाह सोडून ठार केले होते. पूर्ण वाढ झालेले हे अस्वले मागील काही दिवसांपासून या परिसरात फिरत होते. आरोपींनी जंगली डुकरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतात विद्युत तारा टाकून विद्युत प्रवाह लावला. त्यात अडकल्याने दोन्ही अस्वलांचा मृत्यू झाला. लाखनी वनविभागाच्या पथकाने तपास करून २३ फेब्रुवारीला सकाळी चारही जणांना ताब्यात घेतले. त्यांना अटक करून लाखनी येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची वन कोठडी सुनावली आहे.

आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता
वनपरिक्षेत्र अधिकारी एस. पी. गोखले यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून शिकारीसाठी वापरलेल्या तारा, खुंटे आदी जप्त करण्यात आले आहेत. अस्वलांचे वजन भरपूर असल्याने केवळ चार व्यक्तींनीच त्यांना उचलून बाजुला ठेवणे शक्य नाही. यावरून, या प्रकरणात आणखी काही लोकांचा सहभाग असण्याची शक्यता वन विभागाने व्यक्त केली आहे. नजीकच्या काळात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
 

Web Title: Two bear poaching cases, four accused arrested; Five days of forest detention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.