ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे गंभीर, भंडाऱ्यातील रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 02:11 PM2023-05-12T14:11:59+5:302023-05-12T14:13:08+5:30
अपघातानंतर जखमींना पुढील उपचारासाठी दवाखान्यात भरती केलेले आहे
देवानंद नंदेश्वर / भंडारा
भंडारा : भरधाव वेगात असलेल्या ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना साकोली - लाखांदूर मार्गावरील विहीरगांव फाट्याजवळ शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. मंगेश तुकाराम गोटेफोडे (४०) व प्रल्हाद मारुती उपरीकर (५०) दोन्ही रा. सासरा, अशी जखमींची नावे आहेत. मंगेश गोटेफोडे हे सानगडी येथील वैनगंगा कृष्णा कोकण ग्रामीण बँक येथे अस्थाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. प्रल्हाद उपरीकर शेतकरी आहेत.
अपघातानंतर जखमींना पुढील उपचारासाठी दवाखान्यात भरती केलेले आहे. मात्र मंगेश गोटेफोडे गंभीर जखमी असल्याने त्याला भंडारा येथील रुग्णालयात हलवण्यात आले. प्रल्हाद उपरीकर यांच्यावर साकोली येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. अपघात इतका मोठा होता की त्याच्या आघाताने इलेक्ट्रिक सिमेंट खांबाचे दोन तुकडे झाले. चारही बाजूने तारांचा आधार असल्याने व एक दुसरा खांब आधारासाठी असल्यामुळे पुढील धोका टळला. अन्यथा अपघाताची तीव्रता अधिक मोठी असती. ट्रॅक्टर सरळ एका पान टपरीत शिरला. मात्र पानटपरी बंद असल्याने धोका टळला. अगदी जवळच लग्न कार्यातील स्वयंपाकाचे कामदेखील सुरू होते.