बिबट्याने दिला दोन पिलांना जन्म
By admin | Published: August 4, 2016 12:29 AM2016-08-04T00:29:03+5:302016-08-04T00:29:03+5:30
तालुक्यातील सावरला-नांदीखेडा वनक्षेत्रात एका मादी बिबटने दोन छाव्यांना जन्म दिला आहे.
सावरला वनक्षेत्रातील घटना : जयच्या शोधात लागला शोध
पवनी : तालुक्यातील सावरला-नांदीखेडा वनक्षेत्रात एका मादी बिबटने दोन छाव्यांना जन्म दिला आहे. पवनी तालुका वाघाच्या अधिवासासाठी अनुकुल ठरत असल्याचे दिसून येत आहे. पवनी तालुक्यातील वाघ व बिबट्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. वाघांच्या अधिवासासाठी अत्यंत अनुकूल असलेले हे वनक्षेत्र वाघांच्या अधिवासामुळे पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे. बिबट व तिच्या नवजात छाव्यांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने विशेष पथक नियुक्त केले आहे.
पवनी तालुक्यातील वनक्षेत्र उमरेड-कऱ्हांडला या व्याघ्र प्रकल्पात येते. मागील काही वर्षांपासून या अभयारण्यात वाघांची संख्या वाढलेली आहे. त्यातच दोन वर्षांपूर्वी पर्यटकांचे लक्ष वेधून घेणारा आणि स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारा ‘जय’ नामक वाघ नागझिरा अभयारण्यातून उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील पवनी परिसरातील जंगलात अधिवास निर्माण केले आहे.
त्याच्या बेपत्ता होण्याच्या वार्तेनंतर वनविभाग खळबडून जागा झाला. त्याचा शोध घेत असतानाच सावरला वनक्षेत्रात एका बिबट मादीने दोन पिलांना जन्म दिल्याची घटना उघडकीस आली. प्रारंभी ही पिल्ले वाघाची असल्याची चर्चा सुरू झाली. परंतु वनविभागाने ही पिले बिबटची असल्याचे सांगितले. या पिलाच्या सुरक्षेसाठी वनविभागाने पथक तैनात केले असून त्यांच्या निगराणी ठेवण्यात आलेली आहे.