वाघबोडीच्या शाळेला मिळणार दोन वर्गखोल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 09:49 PM2018-09-16T21:49:29+5:302018-09-16T21:49:47+5:30
भंडारा तालुक्यातील वाघबोडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीला तडे गेलेल्या वर्गखोलीत बसून विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे वास्तव 'लोकमतने' उजेडात आणताच जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी वाघबोडी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा तालुक्यातील वाघबोडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीला तडे गेलेल्या वर्गखोलीत बसून विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे वास्तव 'लोकमतने' उजेडात आणताच जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी वाघबोडी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. दोन वर्गखोल्यांचे बांधकाम लवकरच करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे येत्या सत्रात विद्यार्थ्यांना प्रशस्त इमारतीत शिक्षणाचे धडे मिळणार आहेत.
जिल्हा परिषद शाळा वाघबोडी येथील जीर्ण इमारतीचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. येथे इयत्ता १ ते ४ पर्यंत शिक्षण घेतले जाते. येथे दोन शिक्षक असल्याचे दिसून आले. येथे वर्गखोल्यादेखील दोन आहेत. शाळेत शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी मुक्त मनाने जात असतात. परंतु शाळेची शिकस्त झालेली इमारत पाहून शिक्षक, पालकांसह त्यांच्याही निरागस मनाची घालमेल होते. प्रशासनाला मात्र त्याचे सोयरसुतक नसल्याचे चित्र वाघबोडी येथील शाळेत पहावयाला मिळाले होते.
शाळेचे स्लॅब खचलेले असून इमारतीतून तुकडे पडलेले आहेत. शाळेच्या इमारतीला भेगा पडल्या असून दोनही वर्गखोल्या जीर्णावस्थेत आहेत. वाघमोडी येथे चार वर्ग असले तरी विद्यार्थ्यांना बसण्याची सोय नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना शाळेशेजारी असलेल्या हनुमान मंदिरात ज्ञानार्जन दिले जात आहे. तिथे दोन वर्ग बसण्याची सोय केली आहे. स्वयंपाकाच्या खोलीमध्ये विद्यार्थ्यांच्या बसण्याची सोय करण्यात आली आहे. पाऊस थांबल्यानंतर शाळेच्या वºहांड्यात विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था केली जाते. या गंभीर बाबींमुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक दडपणाखाली आहे. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणारे प्रशासन मोठा अपघात होवून विद्यार्थ्यांचा बळी जाण्याची वाट पाहते काय, असा संतप्त सवाल पालकांनी केला होता.
शाळेची दुरूस्ती करण्याची, नवीन वर्गखोल्या बांधकाम करण्याची मागणी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष मंगेश हुमणे, सामाजिक कार्यकर्ता जनार्धन निंबार्ते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गंगाधर बडोले, उपाध्यक्ष विश्वनाथ वालदे, जाकीर शेख, गौतम तिरपुडे, अनिल शेख, जयेंद्र मरस्कोल्हे, राकेश कायते, विक्रम अंबादे, सारीका बडोले, प्रतिक्षा खोब्रागडे, आशिष बडोले यांनी केली होती. जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य नीळकंठ कायते यांनी वाघबोडी शाळेला भेट देऊन जीर्ण इमारतीची पाहणी केली. गावातील पदाधिकाऱ्यांशी व शिक्षकांशी चर्चा केली. यावेळी मुख्याध्यापक नरेंद्र रामटेके, सहाय्यक शिक्षिका रामटेके, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.