४३४ विहिरींवर दोन कोटींचा खर्च
By Admin | Published: July 2, 2015 12:42 AM2015-07-02T00:42:36+5:302015-07-02T00:42:36+5:30
शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनस्तरावरून विविध प्रयत्न सुरू आहेत.
रोजगार हमी योजना : सिंचन विहिरींमुळे शेतकऱ्यांना लाभ, तीन लाखांचे अनुदान
देवानंद नंदेश्वर भंडारा
शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनस्तरावरून विविध प्रयत्न सुरू आहेत. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सिंचन सुविधा बळकट करण्यास हातभार लागत आहे. अनेकांच्या शेतात विहिरीमुळे सिंचनाचे साधन उपलब्ध झाले असून चालू वर्षात जिल्ह्यात रोहयोच्या माध्यमातून ४३४ विहिरींचे बांधकाम झाले. या विहिरींवर तब्बल १ कोटी ९० लाख ५८ हजारांचा खर्च झाला आहे.
सिंचन सुविधा नसलेल्या शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांना शेतपीक घेण्यासाठी प्रोत्साहीत करणे हा या योजनेमागचा उद्देश आहे.
विहिरीचे काम हे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून केल्या जात असून विहिर बांधकामासाठी यापुर्वी मिळणारे १.९९ लाखांचे अनुदान वाढवून या वर्षीपासून ३ लाख रुपए अनुदान करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कल सिंचन विहिर बांधकामाकडे वाढला आहे. यापुर्वी सिंचन विहिरीसाठी केवळ १.९९ लाख रुपये अनुदान मिळायचे. या अनुदानात अनेकांच्या विहिरीचे बांधकाम अपुर्ण असायचे. काही ठिकाणी दगड लागल्यास त्या विहिरीच्या बांधकामास अधिक खर्च यायचा. त्यामुळे शेतकरी विहिर बांधकामास निरूत्साही असायचे. मात्र अनुदान वाढविण्याचा शासनाने निर्णय घेताच लाभार्थ्यांची संख्या वाढली असून अनेकांच्या शेतात आता विहिरी निर्माण झाल्या आहेत.
२०१४-१५ या वर्षांत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विहीर बांधकामासाठी शेतकऱ्यांचे प्रस्ताव भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेकडे प्राप्त झाले. भूजल सर्व्हेक्षण विभागाने प्रस्तावांना बांधकामाची मान्यता दिली. १,१६४ विहिरींचे कामे अपुर्ण असून काही ठिकाणी दगड लागले तर काही ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या विहिरींवर तब्बल २ कोटी ८८ लाख ७ हजारांचा खर्च झाला आहे. या विहिरींचे बांधकाम लवकरच पुर्ण करण्यात येईल, अशी माहिती रोजगार हमी योजना जिल्हा नियंत्रण कक्षाने 'लोकमत'ला दिली.
सध्यस्थितीत ७९ विहिरींसाठी ८१ लाख २२ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. २०१४-१५ मधील अपूर्ण विहिरी व यावर्षी प्रस्ताविक विहिरी पुर्ण करण्यात येईल,अशी माहिती रोजगार हमी योजना जिल्हा नियंत्रण कक्षाने दिली.
लाखांदूर तालुक्याची आघाडी
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सिंचन विहीर बांधकामात लाखांदूर तालुक्याने आघाडी घेतली आहे. या तालुक्यात १३९ विहिरींचे बांधकाम पुर्ण झाले आहे. तर ८१ विहिरींचे बांधकाम अपूर्ण आहे. त्यापाठोपाठ भंडारा तालुक्यात १०५ विहिरींचे बांधकाम पुर्ण झाले आहे. सर्वात कमी केवळ १३ विहिरींचे बांधकाम पवनी तालुक्यात पुर्ण झाले आहे.
निधी मिळण्यास अडचणी
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सिंचनाचे साधन उपलब्ध होत असले तरी अनेक शेतकऱ्यांना दस्ताऐवजाची पुर्तता करूनही निधी मिळण्यास अडचणी येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रस्ताव सादर करून दोन ते तीन वर्ष झाले. मात्र प्रस्तावावर कार्यवाही झालेली नसल्याचे अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासनाने सिंचन विहिरींचे प्रस्ताव लवकर निकाली काढण्याची मागणी आहे.