चपराशानेच केली दोन कोटींची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 06:00 AM2019-11-22T06:00:00+5:302019-11-22T06:00:45+5:30

बँक ऑफ इंडियात कंत्राटी चपराशी म्हणून कार्यरत असलेल्या विशालला बँकेच्या अंतर्गत रचनेची खडान्खडा माहिती होती. त्याने आपल्या मित्राच्या मदतीने चोरी करण्याचा कट रचला. त्यासाठी त्याने चॅनल गेटची बनावट चाबी तयार केली. बँकेच्या मागील भिंतीची खिडकी तोडून आत प्रवेश केला. बनावट चाबीने चॅनल गेट उघडून आत प्रवेश केला.

Two crores of theft was stolen by a traitor | चपराशानेच केली दोन कोटींची चोरी

चपराशानेच केली दोन कोटींची चोरी

Next
ठळक मुद्देदोघांना अटक : साकोली येथील बँक ऑफ इंडियातील प्रकरण, रोख व सोने हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा/साकोली : बँक ऑफ इंडियाच्या साकोली शाखेत कंत्राटी चपराशानेच तब्बल दोन कोटी रुपयांच्या मुद्देमालाची चोरी केल्याचे उघडकीस आले. मित्राच्या मदतीने ही चोरी करण्यात आली असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार चपराशाला छत्तीसगढ राज्यातील बिलासपूर येथे भंडारा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याजवळून एक कोटी ८३ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून यात आणखी कुणाचा सहभाग आहे काय याचा शोध पोलीस घेत आहे.
साकोली येथे बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. या शाखेत विशाल भैयालाल बोरकर (२६) रा. सेंदुरवाफा हा कंत्राटी चपराशी म्हणून कार्यरत आहे. १८ ऑक्टोबरच्या सकाळी बँकेत चोरी झाल्याचे उघडकीस आले. बँक व्यवस्थापक फलींद्र बोरकर यांनी साकोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून चौकशी केली. तेव्हा बँकेत गहाणात ठेवलेले चार किलो २०० ग्रॅम सोने आणि रोख २४ लाख ५५ हजार रुपये चोरीस गेल्याचे पुढे आले. विशेष म्हणजे चोरट्यांनी कोणताही पुरावा मागे ठेवला नव्हता. येथील सीसीटीव्ही यंत्रणाही चोरुन नेली होती.
ही घटना उघडकीस आली तेव्हा विधानसभा निवडणूक होती. पोलिसांवर बंदोबस्ताचाही ताण होता. मात्र जिल्ह्यात सर्वात मोठी चोरी घडल्याने पोलिसांनी या तपासावर लक्ष केंद्रीत केले. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी या चोरीचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर यांच्याकडे दिला. त्यांनी विविध पथके गठीत केली. गोपनीय माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. एवढीमोठी चोरी बँकेत झाल्याने बँकेतीलच कुणाचा हात असावा असा संशय सुरुवातीपासून पोलिसांना होता. मात्र कोणताही पुरावा हाती लागत नव्हता. दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम लांबाडे यांच्या पथकाला सेंदूरवाफा येथील जागेश जयसिंग तरजुले (२४) याच्यावर संशय बळावला. त्याला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने या बँकेतीलच कंत्राटी चपराशी विशाल बोरकर याने चोरी केल्याचे सांगत आपण त्याला सहकार्य केल्याचे सांगितले. चोरी प्रकरणाचा उलगडा झाला असला तरी विशाल मात्र घटनेपासून पसार झाला होता. स्थानीक गुन्हेशाखेच्या पथकाने त्याचा पुणे, गोवा, रायपूर आदी ठिकाणी शोध घेतला. परंतु चलाख विशाल पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर विशाल छत्तीसगढ राज्यातील बिलासपूर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन एक पथक पाठवून त्याला मोठ्या शिताफीने अटक केली. त्याच्याजवळून दहा लाख ८४ हजार रोख आणि एक कोटी ६३ लाख ९८ हजार ३४० रुपयांचे दागिणे हस्तगत करण्यात आले. तर जागेश तरजुले याच्याकडून सहा लाख ९५५० रुपये रोख व दोन लाख १७ हजार ६६३ रुपयांचे दागिणे जप्त करण्यात आले. या चोरीतील एक कोटी ८३ लाख १६ हजार ५५३ रुपये हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर, सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम लांबाडे, गायकवाड, हवालदार वामन ठाकरे, धर्मेंद्र बोरकर, रोशन गजभीये, दिनेश अंबाडारे, चेतन पोटे, स्नेहल गजभीये, कौशीक गजभीये, सुमेध रामटेके, राज कापगते, हरिदास रामटेके यांनी केली.

बिलासपूरमध्ये विशालने घेतली किरायाने खोली
चोरी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार विशाल बोरकर घटना झाली तेव्हापासून पसार झाला होता. त्याच्या मागावर पोलीस होते. दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम लांबाडे यांचे पथक बिलासपूर येथे पोहोचले. त्याठिकाणी विशाल किरायाने खोली करुन राहत असल्याचे माहिती मिळाली परंतु तो खोलीवर अधूनमधून येत होता. त्यामुळे पथकाने त्याच्या खोलीवर पाळत ठेवली. परंतु विशाल खोलीवर आलाच नाही. दरम्यान ही माहिती पोलीस अधीक्षक साळवे यांना देण्यात आली. त्यांनी बिलासपूर पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधला. भंडारा येथील पथकाला मदत करण्यात सांगितले. त्यावरुन बिलासपूर सायबर सेलच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने विशाल बोरकर याला बुधवारी ताब्यात घेण्यात आले.
ग्रिल गेट कुलुपाची तयार केली बनावट चावी
बँक ऑफ इंडियात कंत्राटी चपराशी म्हणून कार्यरत असलेल्या विशालला बँकेच्या अंतर्गत रचनेची खडान्खडा माहिती होती. त्याने आपल्या मित्राच्या मदतीने चोरी करण्याचा कट रचला. त्यासाठी त्याने चॅनल गेटची बनावट चाबी तयार केली. बँकेच्या मागील भिंतीची खिडकी तोडून आत प्रवेश केला. बनावट चाबीने चॅनल गेट उघडून आत प्रवेश केला. आतमध्ये असलेल्या लॉकरच्या चाब्या घेवून चोरी केल्याची कबुली त्याने पोलिसांपुढे दिली.

चार किलो सोने विकताच आले नाही
विशाल बोरकरने मित्राच्या मदतीने चोरी केली. त्यानंतर रोख व रक्कम व सोने घेवून तो पसार झाला. त्यातील काही रकम जागेश तरजुलेला दिली. तर उर्वरित रकम व सोने त्याने वेगवेगळ्या ठिकाणी ठेवली होती. तब्बल चार किलो सोने त्याच्याजवळ होते. मात्र एवढे मोठे सोने विकणे त्याला शक्य झाले नाही. रायपूर येथील सराफा बाजारात जाऊन त्याने चाचपणी केली. परंतु त्याला यश आले नाही. त्यामुळेच चोरीतील संपूर्ण सोने पोलिसांना हस्तगत करणे शक्य झाले.

Web Title: Two crores of theft was stolen by a traitor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर