‘त्या’ अभियंत्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी
By admin | Published: February 5, 2017 12:15 AM2017-02-05T00:15:47+5:302017-02-05T00:15:47+5:30
एक लाख रूपयांची लाच घेताना रंगेहाथ सापडलेले पवनी नगरपरिषदेचे कनिष्ठ अभियंता आनंद बांडेबुचे याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
भंडारा : एक लाख रूपयांची लाच घेताना रंगेहाथ सापडलेले पवनी नगरपरिषदेचे कनिष्ठ अभियंता आनंद बांडेबुचे याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारला सापळा रचून बांडेबुचेला पकडले होते.
२०१५ मध्ये पवनीत एलईडी लाइटस लावण्याचे कंत्राट येथील असाटी इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक रविंद्र असाटी यांना मिळाले होते. या कामाचे ११ लाख ८२,६२१ रूपयांचे देयक पालिकेकडून त्यांना घेणे होते. हे मंजूर बील देण्यासाठी स्वत:साठी दोन लाख आणि मुख्याधिकाऱ्यांना देण्यासाठी ५० हजार असे २.५० लाख रूपयांची मागणी बांडेबुचेने असाटी यांना केली होती. याप्रकरणाची असाटी यांनी भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. दरम्यान, शुक्रवारला असाटी यांच्याकडून एक लाख रूपये घेताना बांडेबुचेला पथकाने पकडले. कारवाईनंतर पवनी पोलीस ठाण्यात बांडेबुचेविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
यासंदर्भात अधिक माहितीसाठी एसीबीशी संपर्क साधला असता ते म्हणाले, बांडेबुचेला भंडारा प्रथम श्रेणी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. आरोपीला भंडारा पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले असून बांडेबुचेच्या चल-अचल संपतींची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास अधिकारी पोलीस निरीक्षक प्रदीप पुल्लरवार हे करीत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)