नवेगावबांध येथे दोन दिवसांचा कडकडीत ‘वीकेंड लॉकडाऊन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:33 AM2021-04-13T04:33:38+5:302021-04-13T04:33:38+5:30
नवेगावबांध : ‘ब्रेक द चेन’अंतर्गत शुक्रवारी (दि.९) रात्री ८ वाजेपासून सोमवारी (दि.१२) सकाळी ७ वाजेपर्यंत येथे अत्यावश्यक सेवा ...
नवेगावबांध : ‘ब्रेक द चेन’अंतर्गत शुक्रवारी (दि.९) रात्री ८ वाजेपासून सोमवारी (दि.१२) सकाळी ७ वाजेपर्यंत येथे अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व आस्थापना व दुकाने कडकडीत बंद होती. ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत २ दिवसांचा कडकडीत ‘वीकेंड लॉकडाऊन’ पाळला जात आहे.
‘वीकेंड लॉकडाऊन’ या कालावधीत गावकऱ्यांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत, येथील सर्व आस्थापना व दुकाने शनिवारी (दि.१०) बंद ठेवण्यात आले होते.
येथील बसस्थानक, आझाद चौक, बालाजी चौक, इंदिरा चौक, टी-पॉइंट चौक हे एरवी वर्दळ असणारे ठिकाण ‘वीकेंड लॉकडाऊन’मुळे निर्मनुष्य झाले होते.
सर्वत्र शुकशुकाट पहायला मिळत असून, नियमांचे पालन व्हावे व संचारबंदीचे उल्लंघन होऊ नये, याकडे नवेगावबांध पोलीस लक्ष ठेवून होते. अत्यावश्यक सेवेत असलेले आस्थापना व दुकाने मात्र ‘वीकेंड लॉकडाऊन’मधून वगळण्यात आली आहेत.
इतर आस्थापना व दुकाने सुरू तसेच अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त नागरिक घराबाहेर आढळल्यास, त्यांच्याविरुद्ध साथरोग अधिनियम १९८७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये कारवाई करण्यात येईल, असे ग्रामपंचायतच्या आदेशात म्हटले आहे.
सोमवारी (दि.१२) सकाळी ७ वाजेपर्यंत घोषित कडकडीत लॉकडाऊनला येथील ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच अनिरुद्ध शहारे व ग्रामविकास अधिकारी परशुराम चव्हाण यांनी केले होते. ठाणेदार जनार्दन हेगडकर व त्यांचे सहकारी गावात गस्त घालत होते. परिस्थितीवर करडी नजर ठेवून होते.