दुचाकींच्या धडकेत दोघांचा मुत्यू; तिघे गंभीर जखमी, डोंगरदेव जवळील घटना
By युवराज गोमास | Published: April 5, 2024 03:12 PM2024-04-05T15:12:58+5:302024-04-05T15:14:56+5:30
करडी पोलिसांत गुन्हा दाखल
करडी (पालोरा) : विरूद्ध दिशेतील भरधाव दोन दुचाकींमध्ये भीषण धडक बसली. यात दोघांचा मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. प्रकरणी करडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना खडकी ते ढिवरवाडा जिल्हा मार्गावर डोंगरदेव येथील नंदलाल कोडवते यांचे शेताजवळ ४ एप्रिल रोजी रात्री ८:३० वाजतादरम्यान घडली. अपघातात मृत्यू पावलेल्यांमध्ये विक्की रविशंकर ठाकरे (१८, केसलवाडा) व हेमंत खंडरे (भंडारा) यांचा समावेश आहे. तर गंभीर जखमींमध्ये राजेश चव्हाण, राहुल बावणे, कुणाल मते यांचा समावेश आहे.
केसलवाडा येथील विक्की रविशंकर ठाकरे व हेमंत खंडरे भंडारा व राजेश चव्हाण हे तिघेजण दुचाकीने ढिवरवाडाकडे जात होते. विरूद्ध दिशेने ढिवरवाडाकडून खडकीकडे दुचाकीस्वार राहुल बावणे, कुणाल मते हे दोघेजण अंडे घेण्याकरीता जात होते. दरम्यान डोंगरदेवजवळ दोघांच्या दुचाकींमध्ये भीषण धडक बसली. पाचही एकमेकांवर आढळल्याने गंभीर जखमी झाले.
या घटनेत विक्की ठाकरे जागेवरच निपचीत पडला होता. पाचही गंभीर जखमींना भंडारा जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. तपासणीअंती डॉक्टरांनी विक्की ठाकरे यास मृत घोषित केले. हेमंत खंडरे, राजेश चव्हाण ढिवरवाडा यांची प्रकृती चिंताजनक असल्याने यांना नागपूर येथे हलविण्यात आले. नागपूर येथे उपचार सुरू असताना हेमंत खंडरे याचा मृत्यू झाला. तर राजेश चव्हाण याचेवर नागपूर येथे उपचार सुरू आहे. राहुल बावणे व कुणाल मते यांच्यावर भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकरणी करडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपास ठाणेदार विलास मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश डोंगरे करीत आहे.
भंडारा व केसलवाडात शोककळा
हेमंत खंडरे हा मूळचा भंडारा येथील असून त्याची सासरवाडी केसलवाडा येथील आहे. एक महीन्यापासून तो केसलवाडा येथे राहत असून पेंटींगचे काम करतो. विक्की ठाकरे व राजेश चव्हाण हे त्यांचेकडे मजुरीने कामावर जात होते. राजेश चव्हाण ढिवरवाडा येथे पोहचवून देण्याकरीता जात असतांना रात्री ८:३० वाजेच्या दरम्यान घडला. त्यामुळे भंडारा व केसलवाडा येथे शोककळा परिसरली आहे.
बहिणीच्या लग्नाआधीच विक्कीने सोडले जग
विक्की ठाकरे याने यावर्षी १२ वीची परीक्षा दिली व कौटुंबिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे वडीलांना आधार देण्यासाठी मजुरीने पेंटींग कामावर जात होता. त्याच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचे डोंगर कोसळला आहे. शुक्रवारी सकाळी त्याच्या चुलत बहिणीचा लग्न कार्यक्रम होता. परंतु, बहिणीच्या लग्नापूर्वीच विक्की सोडून गेल्यामुळे केसलवाडा गावावर शोककळा पसरली आहे. विक्कीच्या कुटुंबात लहान भाऊ व आई-वडील आहेत.