दोन कुटुंबात जागेवरून तुफान हाणामारी; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 05:22 PM2023-01-30T17:22:39+5:302023-01-30T17:26:11+5:30
बांपेवाडा येथील प्रकार
भंडारा : घराशेजारी जागेच्या वादात दोन कुटुंबात तुफान हाणामारी होण्याची घटना साकोली तालुक्यातील बांपेवाडा येथे शनिवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी साकोली ठाण्यात दोन्ही कुटुंबातील सात जणांवर गुन्हा नोंदविला आहे.
राजेश रामनाथ राऊत याने दिलेल्या तक्रारीनुसार तो शनिवारी पानठेल्याकडे जात होता. त्यावेळी आरोपी निखिल सिद्धार्थ जांभुळकर याने त्याला थांबविले. जवळ येऊन आमच्यासोबत जागेवरून कशाला भांडता असे म्हणत मारहाण सुरू केली. त्यावेळी त्याचा मोठा भाऊ आकाश सिद्धार्थ जांभुळकर आणि शैलेश राजकुमार जांभुळकर आले. या तिघांनी त्याला मारहाण सुरू केली. तर आकाशने घरून आणलेल्या काठीने बेदम मारहाण केली. याच प्रकरणात निखिल सिद्धार्थ जांभुळकर याने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी राजेश राऊत (४२) याला घराशेजारी जागेवरून विचारणा केली त्यावेळी त्याने शिवीगाळ करून मारहाण सुरू केली. त्यावेळी निखिलची आई भांडण सोडविण्यासाठी आली असता आरोपी सुषमा किशोर राऊत, शालिनी राजेश राऊत आणि सूरज राऊत सर्व राहणार बांपेवाडा यांनी तिला मारहाण केली. तसेच निखिलच्या वहिनीलाही सेंट्रिंगच्या पाटीने मारहाण केली. यात ती जखमी झाली.
जागेचा वाद विकोपाला
राऊत आणि जांभुळकर परिवारात गत काही दिवसांपासून जागेचा वाद सुरू होता. त्या वादात त्यांच्यात भांडणही होत होते. शनिवारी दोन्ही गट आमनेसामने आले. एकमेकाला काठी आणि लाकडी सेंट्रिंग पाटीने मारहाण करण्यात आली. त्यांच्यावर साकोली येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. आता या प्रकरणाचा तपास हवालदार लेंडे करीत आहेत.