मृत्यूच्या दाढेत दोन कुटुंबांचे वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 10:27 PM2018-08-22T22:27:19+5:302018-08-22T22:28:07+5:30

प्रत्येकाला घर असे शासनाकडून सांगण्यात येत आहे, पंरतु रेंगेपार येथील दोन कुटुंब वैनगंगेच्या अगदी काठावरील घरात वास्तव्याला आहेत. साक्षात मृत्यूच्या दाढेत राहत असून १३ पैकी ११ कुटुंबांना पंतप्रधान घरकूल योजनेचा लाभ मिळाला.

Two families live in death row | मृत्यूच्या दाढेत दोन कुटुंबांचे वास्तव्य

मृत्यूच्या दाढेत दोन कुटुंबांचे वास्तव्य

Next
ठळक मुद्देवैनगंगा नदी काठावरील रेंगेपार येथील प्रकार : १३ पैकी ११ परिवारांना मिळाले घरकूल

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : प्रत्येकाला घर असे शासनाकडून सांगण्यात येत आहे, पंरतु रेंगेपार येथील दोन कुटुंब वैनगंगेच्या अगदी काठावरील घरात वास्तव्याला आहेत. साक्षात मृत्यूच्या दाढेत राहत असून १३ पैकी ११ कुटुंबांना पंतप्रधान घरकूल योजनेचा लाभ मिळाला. केवळ दोन कुटुंबांना नियमात बसत नाही म्हणून वाऱ्यावर सोडण्यात आले. त्यापैकी एक विधवा महिला आहे. वैनगंगा नदीला सध्या पूर आला आहे. सदर पुरात घर वाहून जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मले घर देता का जी घर, असा आर्त टाहो महिलेने फोडला आहे.
तुमसर तालुक्यात रेंगेपार (पांजरा) असे १३०० लोकवस्तीचे गाव आहे. अगदी नदी काठावर येथे १३ घरे आहेत. मागील २० वर्षापासून १३ कुटुंबे येथे वास्तव्याला होती. दिवसेंदिवस वैनगंगा नदीचे पात्र सोडून गावाच्या दिशेने झपाट्याने सरकत गेली. सध्या वैनगंगा नदीचे पात्र गावाजवळ भिडले आहे. १३ कुटुंबात १०२ सदस्यांचा समावेश होता. आंदोलने केल्यानंतर प्रशासनाने गावाशेजारी पंतप्रधान आवास योजनेतून ११ कुटुंबांना घरकुल मंजूर केली, पंरतु दोन कुटुंबांना नियमांचा आधार घेत घरकुल मंजूर केले नाही.
या कुटुंबात विधवा महिला कलाबाई शेंडे व गुलाब कावळे यांचा समावेश आहे. कलाबाई यांच्या कुटुंबात दोन तर कावळे यांच्या कुटुंबात सहा सदस्यांचा समावेश आहे. दोन्ही कुटुंबांची घरे नदी काठावर असून नदी व घरांचे अंतर केवळ एका फुटापेक्षाही कमी आहे. घराचे मागील दार उघडले तर नदी समोर दिसते. भयाणस्थितीत दोन्ही कुटुंब वास्तव्य करीत आहेत. वैनगंगेचा प्रवाह भूखंड नदीकाठावर आदळतो. त्यामुळे खालील माती पाण्यासोबत वाहून जात आहे. त्यामुळे भूस्खलनाचा येथे मोठा धोका आहे.
शासनाने येथे वरिष्ठ अधिकाºयांचे पथक पाठवून पाहणी केली होती. त्यानंतर ११ कुटुंबांना घरकुल मंजूर केली. धोकादायक घरे असा उल्लेख शासनदप्तरी नोंद आहे हे विशेष. राज्याच्या विधीमंडळात व संसदेत येथील घरांचा प्रश्न येथील लोकप्रतिनिधींनी मांडला होता. त्या अनुषंगाने कारवाई झाली, परंतु दोन कुटूंबाना कोणता नियम आडवा येत आहे. याचे उत्तर प्रशासनाकडून मिळाले नाही. घरकूल यादीतील प्रतिक्षा यादीतही दोन कुटुंबांची नावे नाहीत.
कलाबाई यांनी आम्हाला जलसमाधीशिवाय पर्याय दिसत नाही, अशा वेदना बोलून दाखविल्या. घर देता का घर, अशी विनंती करुनही त्यांचा लाभ मिळत नाही अशी व्यथा डोळ्यात अश्रू आणून कलाबाईनी मांडली. 'शासन प्रत्येकाले घर देईन म्हणते, मले कव्हा भेटन' अशा शब्दात त्यांनी शासन व प्रशासनाकडे मागणी केली आहे. माझी मृत्यूशी दररोज भेट होते, परंतु सरकारशी भेट होत नाही, अशी खंत कलाबाईनी व्यक्त केली.

रेंगेपार येथील १३ पैकी ११ कुटुंबांना घरकूल मंजूर करण्यात आले. दोन कुटूंबाना ते नाकारण्यात आले. नियमांचा आधार घेऊन त्यांना घरकूल मंजूर केले नाही. नदीपात्रात दोन्ही घरे समाविष्ट होण्याची दाट शक्यता आहे. अनर्थ घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील. मानवी दृष्टीकोनातून वरिष्ठ लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी येथे विचार करावा.
-हिरालाल नागपुरे, पंचायत समिती सदस्य, तुमसर

Web Title: Two families live in death row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.