विषबाधेतून बिबट्यासह दोन कोल्ह्यांचा मृत्यू; अड्याळ वनपरिक्षेत्रातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2022 07:01 PM2022-02-05T19:01:15+5:302022-02-05T19:05:13+5:30

काही प्राणी मृतावस्थेत असल्याचीही माहिती मिळाल्याने त्यांनी तब्बल तीन किलोमीटरचा परिसर पिंजून काढला. यात बिबट्यासह दोन कोल्हे (जॅकल), तीन रानकुत्रे व एका कालव्यात रानमांजर (बेलमांजर) मृतावस्थेत आढळून आले.

Two foxes, including a leopard, wild cat die from poisoning in adyal forest division bhandara | विषबाधेतून बिबट्यासह दोन कोल्ह्यांचा मृत्यू; अड्याळ वनपरिक्षेत्रातील घटना

विषबाधेतून बिबट्यासह दोन कोल्ह्यांचा मृत्यू; अड्याळ वनपरिक्षेत्रातील घटना

Next
ठळक मुद्देतीन रानकुत्रे व एक रानमांजरीचा समावेश

विशाल रणदिवे

अड्याळ (भंडारा) : विषबाधेने मृत पावलेली शेळी खाल्ल्यामुळे बिबट्यासह दोन कोल्हे, तीन रानकुत्रे व एक रानमांजरीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास उघडकीला आली. पवनी तालुक्यातील अड्याळ वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पिंपळगाव निपानी गटक्रमांकात ही घटना घडली. घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी ताफ्यासह दाखल झाले असून श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले आहे.

माहितीनुसार, अड्याळ वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गटक्रमांक ७४० झुडुपी जंगलांतर्गत येणाऱ्या पिंपळगाव निपानी परिसरात दुपारी १ वाजताच्या सुमारास प्रथमत: एक बिबट मृतावस्थेत आढळला. याची माहिती अड्याळ येथील वनपरिक्षेत्राधिकारी घनश्याम ठोंबरे यांना मिळाली. ताफ्यासह वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. याच वेळी त्यांना अन्य ठिकाणी काही प्राणी मृतावस्थेत असल्याचीही माहिती मिळाल्याने त्यांनी तब्बल तीन किलोमीटरचा परिसर पिंजून काढला. यात दोन कोल्हे (जॅकल), तीन रानकुत्रे व एका कालव्यात रानमांजर (बेलमांजर) मृतावस्थेत आढळून आले.

तीन किलोमीटरच्या परिसरात सात वन्यजीव मृतावस्थेत आढळल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी हा नेमका प्रकार कसा घडला याचा शोध घेतला. लाखनीचे पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ.गुणवंत भडके व त्यांच्या चमूला घटनास्थळी बोलाविण्यात आले. सर्व प्राण्यांच्या शवविच्छेदनानंतर हा प्रकार विषबाधेतुन घडल्याचे निष्पन्न झाले. बिबट हा सात ते आठ वर्षाचा असून ती मादी होती. दोन कोल्हे हे मादी असुन तीन रानकुत्रे नर होते. शवविच्छेदनाची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर त्याच परिसरात त्यांच्यावर अग्निदाह संस्कार करण्यात आले.

अशी घडली असावी घटना

पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या तपासणीनंतर एखादी शेळी विषबाधेने दगावली असावी. ती शेळी या वन्यप्राण्यांनी खाल्ल्याने त्यांचा दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा असा निष्कर्ष काढण्यात आला. तीन किलोमीटरच्या परिसरात हे वन्यप्राणी आढळुन आल्याने नेमकी विषबाधा कुठे झाली असावी याचा कयास बांधला जात आहे. गतवर्षीही अड्याळ वनपरिक्षेत्रात दोन बिबट एका जंगलातील विहिरीत मृतावस्थेत आढळली आहेत. उल्लेखनीय म्हणजे गत सहा महिन्यात वन्यजीव दगावण्याच्या घटनेत वाढ झाली आहे.

जवळपास दोन दिवसांपूर्वी बिबटाचा मृत्यू झाला असावा. सर्व प्राणी विषबाधेने दगावले, या निष्कर्षापर्यंत आम्ही पोहचलो आहोत. अधिक माहिती काढण्याचे काम सुरु आहे.

डाॅ.गुणवंत भडके, पशुवैद्यकीय अधिकारी, लाखनी

Web Title: Two foxes, including a leopard, wild cat die from poisoning in adyal forest division bhandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.