पावणेतीन कोटींच्या धान घोटाळ्यात १५ जणांवर गुन्हा; दोन ग्रेडरवर अटकेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 04:31 PM2023-02-13T16:31:01+5:302023-02-13T16:32:44+5:30
आंबागड येथील प्रकरण
तुमसर (भंडारा) : नाकाडोंगरी येथील धान खरेदी केंद्रात सुमारे चार कोटींचा अपहार झाल्याची शाई वाळत नाही तोच तुमसर तालुक्यातील आंबागड येथे आधारभूत धान खरेदी केंद्रात दोन कोटी ७१ लाख ३४ हजार रुपयांचा अपहार झाल्याची घटना उघडकीस आली. जिल्हा पणन अधिकारी भारतभूषण पाटील यांनी आंधळगाव पोलिस ठाण्यात संबंधिताविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एकूण १५ जणांचा समावेश असून दोन ग्रेडर यांना अटक करण्यात आली आहे.
अरविंद भगवान दास भुतांगे व स्वप्निल राजेश शामकुवर दोन्ही रा. आंबागड अशी अटक केलेल्या ग्रेडर यांची नावे आहेत. अन्य जणांवर गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये राधेशाम तोलाजी रहांगडाले (अध्यक्ष), संचालक म्हणून गोपीचंद कवळू बावनकर, सुधीर चंदुलाल ठाकरे, संजय फत्तु कावळे, निलकंठ रतिराम मोरे, घनशाम झागडुसाव जांभुळपाने, राजेश सुखराम शामकुवर, नंदलाल डोमाजी रहांगडाले, बुधराज पंढरी पटले, श्रीपत अंतु कोकोडे, गणेश उदेसिंग पंचरे, रत्नमाला भगवान भुतांगे, सचिव अनिल तोलाजी रहांगडाले तर ग्रेडर अरविंद भगवानदास भुतांगे व स्वप्नील राजेश शामकुवर यांचा समावेश आहे.
विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित आंबागड, ता. तुमसर या नावाने असलेल्या संस्थेमध्ये असलेल्या १५ जणांनी संगनमत करून आंबागड येथे धान खरेदी केंद्र असलेल्या धान खरेदी हंगाम सन २०२१-२०२२ मध्ये खरीप हंगामाचे प्रत्यक्ष धान खरेदी न करता धान खरेदी केल्याचे खोटे दस्तऐवज तयार करून शासनाची व मार्केटिंग फेडरेशन व शेतकऱ्याची दोन कोटी ७१ लाख ३४ हजार ४३८ रुपयांचा अपहार करून फसवणूक केली. जिल्हा पणन अधिकारी भारतभूषण पाटील यांनी आंधळगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी १५ जणांविरुद्ध भादंविच्या ४०६, ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक नितीन राजकुमार करीत आहेत.