'त्या' गुराख्याच्या अंगावरून धावत गेल्या तब्बल दोनशे गायी; भंडारा जिल्ह्यातील अनोखी दिवाळी परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2021 07:10 AM2021-11-07T07:10:00+5:302021-11-07T07:10:01+5:30

Bhandara News जमिनीवर पालथे झोपून असलेल्या गुराख्याच्या अंगावरून गोधन पळविण्याची अनोखी परंपरा मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथे १५० वर्षांपासून सुरू आहे. यंदाही ही परंपरा पाळण्यात आली.

Two hundred cows ran over the body of 'that' cowherd; Unique Diwali tradition in Bhandara district | 'त्या' गुराख्याच्या अंगावरून धावत गेल्या तब्बल दोनशे गायी; भंडारा जिल्ह्यातील अनोखी दिवाळी परंपरा

'त्या' गुराख्याच्या अंगावरून धावत गेल्या तब्बल दोनशे गायी; भंडारा जिल्ह्यातील अनोखी दिवाळी परंपरा

googlenewsNext
ठळक मुद्देजांभोरा येथील चित्तथरारक गोधन पूजा


युवराज गोमासे

भंडारा: बलिप्रतिपदेच्या दिवशी विविध पध्दतीने गोधन पूजा सर्वत्र केली जाते. या विविध पद्धतींमध्ये जमिनीवर पालथे झोपून असलेल्या गुराख्याच्या अंगावरून गोधन पळविण्याची अनोखी परंपरा मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथे १५० वर्षांपासून सुरू आहे. यंदाही ही परंपरा पाळण्यात आली.

यंदा बलिप्रतिपदेला शुक्रवारी जांभोरा येथील गुराखी विनायक सुरेश परतेकी (३४) यांच्या अंगावरून २०० गायींचा कळप धावत गेला. ही अनोखी परंपरा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक एकत्र आले होते.

मोहाडीपासून ३५ कि.मी. अंतरावर तालुक्याच्या टोकावर जांभोरा चार हजार लोकवस्तीचे गाव आहे.  या गावात १०० टक्के शेतकरी असून त्या सर्वांकडे मिळून १५० ते २०० गायी आहेत. शेती करणे हा मुख्य व्यवसाय या गावात आहे. गावातील सर्व गायी चारायला नेण्याचे काम पिढ्यानपिढ्या परतेकी कुटुंबाकडे आहे. १५० वर्षांपूर्वी गोधन अंगावरून चालवण्याची प्रथा परतेकी कुटुंबाने सुरू केली.

बलिप्रतिपदेच्या दिवशी गावातील सर्व गायींना पाण्याचे आंघोळ घातली जाते. शिंगे रंगवून सजविले जाते. तांदळाची खीर गायींना खाऊ घातल्यानंतर संपूर्ण गोधनाची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. ही मिरवणूक मुख्य चौकात आल्यानंतर गुराखी जमिनीवर पालथा झोपतो आणि संपूर्ण गोधन त्याच्या अंगावरून जाते. तरी देखील गुराख्याला कुठलीही इजा होत नाही. हा कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील गावातील लोकं जांभोरा येथे उपस्थित होतात. तसेच गावातील लोकही याप्रसंगी सर्व भेदभाव विसरुन गोधन पूजेला उपस्थित राहतात.

या परंपरेचे पालन करणाऱ्या गुराखी विनायक परतेकी यास कोणतीही दुखापत, इजा झाली नाही. गोमातेमुळेच आपण सर्व जिवंत आहोत. तिचे ऋण फेडण्यासाठी आम्ही तिच्या चरणाखाली स्वत:ला वाहून घेतो. यात काहीच वावगे नाही, हा अंधश्रद्धेचाही प्रकार नाही. आमच्या आजोबा पणजोबापासून ही प्रथा सुरू आहे, आणि ती कायम ठेवणे आमचे कर्तव्य आहे, असे तो हसतमुखाने सांगतो.

Web Title: Two hundred cows ran over the body of 'that' cowherd; Unique Diwali tradition in Bhandara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.