खुनाचे दोन मारेकरी १२ तासात गजाआड

By Admin | Published: August 1, 2015 12:08 AM2015-08-01T00:08:02+5:302015-08-01T00:08:02+5:30

पैशासाठी महिलेचा खून व तरुणीवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व भंडारा पोलिसांनी अवघ्या १२ तासात आरोपींना अटक केली.

Two of the killers killed in the gunfight in 12 hours | खुनाचे दोन मारेकरी १२ तासात गजाआड

खुनाचे दोन मारेकरी १२ तासात गजाआड

googlenewsNext

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी : २.४९ लाख रुपयांचा ऐवज जप्त, मुलगा व तरुणीची प्रकृती धोक्याबाहेर
भंडारा : पैशासाठी महिलेचा खून व तरुणीवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व भंडारा पोलिसांनी अवघ्या १२ तासात आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून २.४९ लाख रुपयांचे ऐवज व साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध भादंवि ३०२, ३०७, ४५२, ३९७ कलमान्वये गुन्हे नोंदविले आहेत.
सचिन कुंडलिक राऊत (१९) रा. तकीया वॉर्ड आणि आमिर इजाज शेख (२०) रा. अशरफी नगर, तकीया वॉर्ड अशी या आरोपींची नावे आहेत. आरोपी अमीर शेख व सचिन राऊत हे व्यवसायाने एअर कंडीशनर रिपेरींगचे काम करतात व दोन्ही गुन्ह्याच्या घटनास्थळी ए. सी. कंपनीकडून आल्याचे सांगून ए.सी.चा नंबर नोट करुन कंपनीला कळवायचे आहे, असे सांगून घरात प्रवेश केला होता.
म्हाडा कॉलोनीतील रविंद्र शिंदे यांची मुलगी अश्विनी ही एकटी असताना या आरोपींनी एसी दुरुस्त करण्यासाठी आल्याचे सांगून तिला पिण्यासाठी पाणी मागितले. पाणी आणण्यासाठी ती घरात जाताच आरोपींनी चोरीसाठी घरात प्रवेश केला. तिथे झटापटीत तिच्यावर जीवे माण्याचा उद्देशाने शस्त्राने वार केले. यात अश्विनी रक्तबंबाळ होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडली. त्यानंतर आरोपींनी घरातील लॅपटॉप, सोन्याचे दागिणे व एटीएम कार्ड चोरुन नेले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींचा शोध सुरू केला. दरम्यान दुपारी एटीएममधून पैसे काढल्याने त्याचा संदेश मोबाईलवर आला आणि आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. अश्विनीवर नागपुरात उपचार सुरू असून तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
काल गुरुवारला रात्री ८ वाजताच्या सुमरास तकीया वॉर्डातील समृध्दीनगर येथील महेश बारीया (पटेल) यांच्या घरीही एसी दुरुस्त करण्यासाठी आल्याचे सांगून पिण्यासाठी पाणी मागितले. यावेळी प्रिती रुपेश बारीया (पटेल) या घरात जाताच या दोन्ही आरोपींनी घरात प्रवेश करुन तिला मुलगा भव्य पटेल (८) यांच्या डोक्यावर शस्त्राने वार केले. यात दोघेही रक्तबंबाळ झाले. त्यानंतर घरी परतलेल्या रुपेश पटेल यांना हे पत्नी व मुलगा रक्ताच्या थारोळ्यात दिसले. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. तोपर्यंत प्रीती पटेल यांचा मृत्यू झाला होता. मुलगा भव्य हा गंभीररित्या जखमी होता. त्याच्यावर नागपूर येथे उपचार सुरू असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर त्यांना दोन्ही गुन्ह्यातील पद्धत सारखीच असल्याचे दिसून आले. दोन्ही घटनातील आरोपी एकच असावे असा निष्कर्ष त्यांनी काढला. त्यानंतर भंडारा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने २० चमू तयार करुन वेगवेगळ्या ठिकाणी पाठविले.
भंडारा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने तपास चक्रे वेगाने फिरवून अवघ्या १२ तासाच्या आत आरोपींचा छडा लावला. आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीला गेलेला मुद्देमाल लॅपटॉप, रोख रक्कम, एटीएम कार्ड, शिंदे यांचे कागदपत्रे, गुन्ह्यात वापरलेले शस्त्र व दुचाकी वाहन असा एकूण २.४९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा तपास पोलीस अधीक्षक दिलीप झलके, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बावरकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रशांत कोलवाडकर, पोलीस निरिक्षक हेमंत चांदेवार सहायक पोलीस निरीक्षक गौरव गावंडे, जयंत गादेकर, जयदेव नवखरे, अरुण झंझाड, प्रितीलाल रहांगडाले, वामन ठाकरे, राजेश गजभिये, रमेश चोपकर, सावन जाधव, दिनेंद्र आंबेडारे, स्रेहल गजभिये, बबन अतकरी, रमाकांत बोंदरे, चेतन पोटे, अनुप वालदे, दिलीप कुथे, विलास बांते यांनी केला. (जिल्हा प्रतिनिधी)
अशी आली घटना उघडकीस
अश्विनी शिंदे या तरुणीवर जीवघेणा हल्ला केल्यानंतर या दोन आरोपींनी शिंदे यांच्या घरातून लॅपटॉप, रोख रक्कम आणि रवींद्र शिंदे यांचे एटीएम कार्ड चोरुन नेले होते. त्यानंतर या आरोपींनी बेला येथील एका एटीएम मशिनमधून ११ हजार रुपये काढले. एटीएममधून पैसे निघताच रवींद्र शिंदे यांच्या मोबाईलवर पैसे काढल्याचा संदेश गेला. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना कळविले. पोलिसांच्या तपासात बेला येथील इंडियन ओवरसीज बँकेतून पैसे काढल्याचे निष्पन्न झाले. तेथील सीसीटीव्ही फुटेज आणि शिंदे यांच्या घराजवळच्या तलमले यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपी तोच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपींना शुक्रवारला सकाळीच अटक केली. शिंदे यांच्या दुपारी धाडसी चोरी केल्यानंतर या दोन्ही आरोपींनी भक्कम दारु ढोसली. त्यात पैसे कमी संपल्यामुळे आरोपींना पुन्हा असा लूटमार करण्याचे ठरविले. रात्री आठ वाजता समृद्धीनगरात पटेल यांच्या घरी धाडसी चोरी करण्याच्या उद्देशातून प्रीती पटेल यांचा खून करुन फरार झाले. दोन्ही घटना सारख्या असल्यामुळे आरोपी एकच असावेत या निर्णयावर पोलीस पोहोचले. सकाळीच आरोपींना पोलिसांनी अटक केली.
अंमली पदार्थाच्या अधीन
अश्विनीवर जीवघेणा हल्ला व प्रीती पटेल यांचा खून करणारे हे आरोपी १९ व २० वर्षांचे आहेत. हे दोन्ही आरोपी मागील काही वर्षांपासून अंमली पदार्थ सेवन करीत असल्याचे त्यांच्या मित्रमंडळींनी सांगितले. ते नेहमी चरस, गांजा आणि ड्रग्जचे (पांढरी भुकटी) सेवन करतात. उन्हाळ्यात हे आरोपी एसी दुरुस्तीचे काम करतात. आता काम नसल्यामुळे पैसा नाही. त्यामुळे पैशासाठी या आरोपींनी चोरीचा मार्ग अवलंबला. चोरी करताना आड आल्यास त्याचा खून केला.
शहरात अंमली पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री
भंडारा जिल्ह्यात गांजाची मोठ्या प्रमाणात विक्री होते. भंडारा शहरात हे अंमली पदार्थ कुठून येते त्याचा शोध घेण्याचे आव्हान नवीन पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांच्यासमोर उभे ठाकले आहे. भंडारासारख्या शांत शहरात अवघ्या विशीतील ही मुले अंमली पदार्थाच्या सेवनाकडे वळल्यामुळे आणि विघातक कृत्य करु लागले आहेत. दोन महिन्यापूर्वी एका १८ वर्षाच्या तरुणाला गांजा न मिळाल्यामुळे त्याने वैनगंगा नदीत उडी मारली होती. दैव बलवत्तर म्हणून तो बचावला. आता त्याला बाहेरगावी ठेवण्यात आले आहे. गांजा विकणारी टोळी ही गांजा पिणाऱ्यांना घरपोच सेवा देतात. यात मोठी टोळी सक्रीय आहे. पोलिसांना हे अंमली पदार्थ विक्रीचे सारे अड्डे माहित आहेत. ‘लोकमत’ने हिवाळी अधिवेशनाच्या काळात भंडाऱ्यातील गांजाचे व गांजा पिऊन झालेल्या थोटकाचे व विक्रीच्या घटनास्थळाचे छायाचित्र प्रकाशित करुन वास्तव समोर आणले होते. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी पोलिसांचा पहारा तैनात केला होत. त्यानंतर चार दिवसातच पुन्हा जैसे थे परिस्थिती झाली. अल्पवयीन मुले गांजा सेवनाकडे वळल्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे.

Web Title: Two of the killers killed in the gunfight in 12 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.