विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने दोन नर अस्वलांचा मृत्यू, गुन्हा दाखल

By युवराज गोमास | Published: February 18, 2024 07:57 PM2024-02-18T19:57:55+5:302024-02-18T19:58:16+5:30

लाखनी वनपरिक्षेत्रातील रामपूरी शेतशिवारातील घटना

Two male bears killed by electric current | विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने दोन नर अस्वलांचा मृत्यू, गुन्हा दाखल

विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने दोन नर अस्वलांचा मृत्यू, गुन्हा दाखल

युवराज गोमासे/ भंडारा : शेतशिवारात पिकांच्या संरक्षणासाठी लावलेल्या जिवंत विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने दोन नर अस्वलांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना लाखनी वनपरिक्षेत्रातील रामपूरी शेतशिवारात १८ फेब्रुवारी सकाळी ७:३० वाजतादरम्यान गस्तीवरील वनरक्षकामुळे उघडकीस आली. शवविच्छेदन अहवालानंतर प्रकरणी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

वनविभाग भंडारा अंतर्गत लाखनी वनपरिक्षेत्रातील, सहवनक्षेत्र लाखनी, नियतक्षेत्र रामपुरी गावातील शेतशिवारात दोन नर असवल मृत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे वनाधिकाऱ्यांनी मौका स्थळ पाहणी केली असता श्रीराम गायधने रा. रामपुरी यांचे खासगी शेती गट क्रमांक ४४५/२ व राजकुमार कोडापे यांचे खासगी शेती गट क. ४७८ मध्ये दोन नर अस्वल मृतावस्थेत आढळले. दाेन्ही शेतकऱ्यांचे शेतशिवार जंगलालगत आहेत. प्रकरणी शवविच्छेदनाकरीता पालांदूर येथील पशुधन विकास अधिकारी देवयानी नगराळे यांना पाचारण करण्यात आले.

शवविच्छेदनानंतर दोन्ही अस्वलांचा मृत्यू जीवंत विद्युत प्रवाहाने झाल्याचा प्राथमिक अंदाज दर्शविण्यात आला. दोन्ही मृत अस्वलांच्या छातीवर विद्युत प्रवाहाच्या निशाणी दिसून आल्या. मात्र, अस्वलांचे नखे व दातांसह सर्व अवयव साबूत असल्याचे दिसून आले. प्रकरणी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये वन्यजीव गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

प्रकरणाची चौकशी भंडारा वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल गवई, साकोली येथील सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो, अतिक्रमण निर्मुलन) रोशन राठोड यांचे मार्गदर्शनात लाखनी वनपरिक्षेत्र अधिकारी एस. पी, गोखले करीत आहेत. आरोपींचा शोध घेतला जात असून लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शवविच्छेदनावेळी मानद वन्यजीव रक्षक शाहिद खान, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी अजहर हुसैन व मोठ्या संख्येने वनाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पीक संरक्षणासाठी विद्युत प्रवाह टाळण्याचे आवाहन
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक संरक्षण करण्याकरीता विद्युत प्रवाहाचे वापर करणे टाळावे. विद्युत धक्क्याने होणारे वन्यप्राण्यांच्या नुकसानीचे अघोरी काम थांबवावे. अशा घटनांची गोपनिय माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक १९२६ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा विभागीय कार्यालय भंडारा, वनपरिक्षेत्र कार्यालय लाखनी येथे प्रत्यक्ष येवुन माहिती देता येईल, असे आवाहन वनविभागाचेवतीने करण्यात आले आहे.

चोवीस तासातील दुसरी घटना
तुमसर तालुक्यातील रोंघा नियतक्षेत्रात १७ फेब्रुवारी रोजी एका नर बिबट्याचा मृतदेह आढळला. नाल्यातील खोलगट भागात तीन ते चार दिवसांपूर्वी बिबट्याचा मृत्यू होवून त्याचे संपूर्ण अवयव साबूत होते. त्या प्रकरणाची शाई वाळत नाही तोच २४ तासात दोन नर अस्वलांचा पिकांच्या संरक्षणासाठी लावलेल्या जीवंत विद्युत प्रवाहाने मृत्यू झाला. वनविभागाने या प्रकरणी गांर्भीयाने लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Two male bears killed by electric current

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.