दोन नगर पंचायतींचे शिलेदार आज ठरणार
By admin | Published: November 30, 2015 12:45 AM2015-11-30T00:45:29+5:302015-11-30T00:45:29+5:30
जिल्ह्यातील मोहाडी, लाखांदूर व लाखनी या तीन नगर पंचायतीच्या नगराध्यक्षाची निवड सोमवारला होऊ घातली आहे.
मोहाडीत अविरोध : लाखांदुरात हुमणे
भंडारा : जिल्ह्यातील मोहाडी, लाखांदूर व लाखनी या तीन नगर पंचायतीच्या नगराध्यक्षाची निवड सोमवारला होऊ घातली आहे. या तिन्ही नगर पंचायतीमध्ये अनुक्रमे एक, दोन व तीन असे नामांकन दाखल करण्यात आले. मोहाडी नगर पंचायतीत नगराध्यक्ष पदासाठी स्वाती निमजे यांचे एकमेव नामांकन दाखल झाल्यामुळे त्यांच्या अविरोध निवडीची घोषणा तेवढी शिल्लक आहे.
भंडारा जिल्ह्यातील १७ सदस्यीय मोहाडी, लाखनी आणि लाखांदूर या तीन नगरपंचायतीची निवडणूक पार पडली. मोहाडी नगरपंचायतमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले. मोहाडीत काँग्रेस १२, भाजप ०३, राष्ट्रवादी ०१, अपक्ष ०१ असे पक्षीय बलाबल आहे. नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत जे होते त्यांना आरक्षणाचा फटका बसल्यामुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
लाखनी येथे काँग्रेसचे संख्याबळ सर्वाधिक आहे. लाखनीत काँग्रेस ०७, भाजप ०६, राष्ट्रवादी ०२, अपक्ष ०२ असे पक्षीय बलाबल आहे. याठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीची घोषणा केली. येथे नगराध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलाकरिता राखीव आहे. काँग्रेसतर्फे कल्पना भिवगडे, भाजपातर्फे ज्योती निखाडे यांनी तर लाखनी विकास मंच आघाडीतर्फे सुशीला भिवगडे यांनी नामांकन दाखल केले आहे.
लाखांदूर येथे लाखांदूर भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. १७ सदस्यीय लाखांदूर नगर पंचायतमध्ये भाजपा ११, काँग्रेस ५, राष्ट्रवादी १ तर अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. नगराध्यक्षपद महिला प्रवर्गाकरीता राखीव आहे. नगराध्यक्षपदाकरिता भाजपाकडून नीलम हुमणे तर काँग्रेसकडून नीलिमा टेंभुर्णे यांना नामांकन दाखल केला. भाजपकडून नामांकन दाखल केलेल्या नीलम हुमणे हे अपक्ष निवडून आले. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. उद्या त्यांच्या विजयाची घोषणा तेवढी शिल्लक आहे. (जिल्हा प्रतिनिधी)