जंगल सफारीसाठी होणार दोन नवे मार्ग
By admin | Published: March 26, 2017 12:19 AM2017-03-26T00:19:35+5:302017-03-26T00:19:35+5:30
उमरेड-कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी नवे दोन प्रवेशद्वार होणार आहेत.
भुयार व वाहीला प्रवेशद्वार : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यामुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ
प्रशांत देसाई भंडारा
उमरेड-कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी नवे दोन प्रवेशद्वार होणार आहेत. याबाबत वनविभागाने भुयार व वाही येथून पर्यटकांसाठी प्रवेशद्वार ठेवण्याचे चिन्हांकित केले आहे. यामुळे भंडारा जिल्ह्यातील निसर्ग पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार आहे.
नागपूर जिल्ह्यातील उमरेड-कऱ्हांडला या व्याघ्र प्रकल्पाच्या सीमा भंडारा जिल्ह्यातील पवनी जंगलालगत आहेत. पवनी येथील वनक्षेत्र हे प्रादेशिक वनविभागाच्या अखत्यारित आहे. त्यालगत असलेल्या उमरेड-कऱ्हांडला या महत्त्वाकांक्षी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमा लागून आहेत. येथून पाच कि.मी. अंतरावर हे वन्यजीव कोअर एरिया आहे. पवनी तालुक्यात वाघ, बिबट या प्राण्यांसह सांबर, हरिण, रोही व अन्य प्राण्यांचाही अधिवास आहे. यामुळे या क्षेत्रात निसर्ग पर्यटनाला मोठा वाव आहे. उमरेड कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्पात पर्यटक मोठ्या संख्येने येतात. या पर्यटकांना पवनी येथील बफर क्षेत्रातील निसर्ग पर्यटनाचा लाभ घेता यावा यासाठी भुयार व वाही येथे प्रवेशद्वार सुरु करण्याचे संकेत वनविभागाने चिन्हांकित केले आहे. पवनी वनविभागांतर्गत सावरला येथे ग्रामवन समिती तर कन्हाळगाव येथील संयुक्त वनव्यवस्थापन समिती हे निसर्ग पर्यटन संकुलाची व्यवस्था सांभाळणार आहेत. ४० ते ५० कि.मी.चे हे जंगल सफारी राहणार आहे. या रस्त्याला वनविभागाने चिन्हांकीत करून तसा प्रस्ताव तयार केला आहे. उमरेड - कऱ्हांडलामुळे या वनक्षेत्राचा पर्यटनवाढीसाठी लाभ होणार आहे.
येथे राहणार प्रवेशद्वार
नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील पवनी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या भुयार येथे एक प्रवेशद्वार तर पवनी तालुक्यातील वाही येथे दुसरे प्रवेशद्वार राहणार आहे. चंद्रपूर व उमरेडमार्गे येणाऱ्या पर्यटकांना भुयार प्रवेशद्वारावरून प्रवेश करता येईल. तर भंडारा येथून येणाऱ्या पर्यटकांना वाही प्रवेशद्वारावरून प्रवेश मिळणार आहे.
नाईट सफारीचाही मानस
पेंच व नागलवाडी या व्याघ्र प्रकल्पात नाईट सफारीचा आनंद पर्यटक घेत आहेत. याच धर्तीवर पवनी येथील निसर्ग पर्यटन रात्रीच्या वेळी बघता यावे, या दृष्टीनेही ‘नाईट सफारी’ सुरु करण्याचा वनविभागाचा मानस आहे. त्यादृष्टीने वनविभागाने तयारी चालविली असून येत्या काही दिवसातच पवनी क्षेत्रातील प्रादेशिक वनविभागाचा बफर झोनमध्ये समावेश होणार असून त्याकरिता केंद्र सरकारच्या मंजुरीची प्रतिक्षा आहे. यानंतर या क्षेत्राचा कायापालट होईल, असा मानस वनविभागाने व्यक्त केला आहे.
निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून वनविभागाच्या क्षेत्रातील गावांचा आर्थिक व अन्य साधनसामुग्रीच्या दृष्टीने विकास व्हावा यासाठी निसर्ग पर्यटन संकुलाची निर्मिती करण्यात येणार आहे. नवीन जंगल सफारीकरीता दोन रस्ते चिन्हांकीत केले आहे. येत्या काही दिवसात ते पर्यटकांसाठी खुले होतील.
- उमेश वर्मा,
उपवनसंरक्षक, भंडारा