तुमसर उपजिल्हा रुग्णालयात एका बेडवर दोन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 10:05 PM2018-09-21T22:05:58+5:302018-09-21T22:06:27+5:30
तालुक्यात संसर्गजन्य आजाराने डोके वर काढले असून येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांची गर्दी झाली आहे. १०० खाटांच्या या रुग्णालयात सध्या १५० ते १६० रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे एका बेडवर दोन रुग्णांवर उपचार करण्याची वेळ आली आहे. मात्र त्यामुळे रुग्णांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे.
मोहन भोयर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तालुक्यात संसर्गजन्य आजाराने डोके वर काढले असून येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांची गर्दी झाली आहे. १०० खाटांच्या या रुग्णालयात सध्या १५० ते १६० रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे एका बेडवर दोन रुग्णांवर उपचार करण्याची वेळ आली आहे. मात्र त्यामुळे रुग्णांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे.
तुमसर येथे सुभाष चंद्रबोस उपजिल्हा रुग्णालय आहे. गत आठ-दहा दिवसांपासून या रुग्णालयात रुग्णसंख्या प्रचंड वाढली आहे. वातावरणातील बदल आणि वाढत्या तापमानाने संसर्गजन्य आजार वाढले आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या खाटांची क्षमता १०० आहे. मात्र रुग्णालयात १५० ते १६० रुग्ण उपचारासाठी दाखल आहे. त्यामुळे एका बेडवर दोन रुग्णांवर उपचार करावे लागत आहे. रुग्णालय प्रशासन कुणाला नाही म्हणून शकत नाही. त्यांचा नाईलाज असल्याने एका खाटेवर दोन रुग्णांची सोय करण्यात आली. परंतु याचा मन:स्ताप रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना होत आहे. तसेच संसर्गजन्य आजार रुग्णालयातही पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.
तुमसर येथील रुग्णालयात तुमसर तालुक्यास मध्यप्रदेशातील रुग्ण उपचारासाठी येतात. सुमारे अडीच लाख नागरिकांच्या आरोग्याची काळजी सदर रुग्णालय घेत आहे. राज्यस्तरावर या रुग्णालयाला आतापर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे.
जागतिक बँकेच्या सहकार्याने तीन कोटींच्या निधीतून १०० खाटांचे रुग्णालय बांधण्यात आले. परंतु वाढती लोकसंख्या आणि आजाराचे वाढते प्रमाण त्यामुळे खाटांची संख्या कमी पडत आहे. अशास्थितीत १५० खाटांचे रुग्णालय करण्याची गरज आहे. परंतु याबाबत कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने रुग्णांना मन:स्ताप सहन करावा लागतो.
यासंदर्भात रुग्णालयाच्या अधीक्षीका डॉ. कल्पना म्हसकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मोबाईलवर प्रतिसाद दिला नाही. तर युवक काँग्रेसचे नेते डॉ. पंकज कारेमोरे म्हणाले, आरोग्य सुविधा पुरविणे ही शासनाची नैतिक जबाबदारी असून उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ किमान ५० खाटा वाढविण्याची गरज आहे. मात्र शासन आणि प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याचे त्यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
बाह्यरुग्ण विभागात रांगा
सध्या तालुक्यात ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी आदी आजाराने डोके वर काढले आहे. गावागावातील रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत आहे. त्यामुळे बाह्य रुग्णविभागात रुग्णांची लांब रांग लागलेली दिसून येते. अनेक रुग्ण उपचारासाठी येथे दिवसभर ताटकळत असतात.