रेती घाटावरील दोन पोकलँडची चोरी
By Admin | Published: July 6, 2017 12:36 AM2017-07-06T00:36:59+5:302017-07-06T00:36:59+5:30
रेतीचे अवैध उत्खनन करण्याप्रकरणी तुमसर तहसीलदार गजेंद्र बालपांडे यांनी दोन पोकलँडवर कारवाई केली.
तुमसर तालुक्यातील प्रकार : गोबरवाही पोलिसात तक्रार दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : रेतीचे अवैध उत्खनन करण्याप्रकरणी तुमसर तहसीलदार गजेंद्र बालपांडे यांनी दोन पोकलँडवर कारवाई केली. सरकारी ताब्यातील हे दोनही पोकलँड चोरीला गेले. या प्रकरणाने प्रशासनात प्रचंड खळबड उडाली आहे. याप्रकरणी गोबरवाही पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तुमसर तालुक्यातील देवनारा रेतीघाटावर रेती माफियांनी मागील काही दिवसांपासून उच्छाद मांडला आहे. रेती उत्खननाची परवानगी नसतानाही अवैधरित्या येथे पोकलँड मशीनच्या माध्यमातून रेती माफिया राजरोसपणे रेतीचे उत्खनन करीत आहे. या माहितीवरून तुमसरचे तहसीलदार गजेंद्र बालपांडे यांनी १ जुलैला दुपारच्या सुमारास देवनारा रेतीघाटावर पोहचले. यावेळी त्यांच्यासह त्यांचे अधीनस्थ कर्मचारी होते. यावेळी त्यांना मॉडेल आर २१५ एलसी सात सीरीयल नंबर एन ६०३ सी ११६२४ हा पिवळ्या रंगाचा तर टाटा हिटाची नंबर ईएक्स २१० एलसीएच व्ही केसरी रंगाची असे दोन पोकलँड मशीनच्या माध्यमातून रेतीचे उत्खनन करीत असल्याचे आढळून आले. या दोन्ही मशीनवर तहसीलदार बालपांडे यांनी कारवाई केली.
घटनास्थळाचा पंचनामा करून दोनही पोकलँड मशीन जप्त केले. त्यानंतर देवनाराचे पोलीस पाटील सुधाकर कोरडे यांना सुपूर्द नाम्यावर दोनही मशीनची जबाबदारी सोपविली. एक तारखेला करण्यात आलेल्या तारखेनंतर हे दोनही मशीन देवनारा रेतीघाटालगत नदीपात्रापासून एक कि़मी. अंतरावर ठेवण्यात आले होते.
दोन तारखेला सकाळी पोलीस पाटील कोरडे हे पोकलँड ठेवलेल्या ठिकाणी गेले असता त्यांना दोन्ही पोकलँड दिसून आले नाही. याची माहिती त्यांनी तातडीने तुमसर तहसीलदार बालपांडे यांना दिली. या मशीन चोरी प्रकरणी पोलीस पाटील कोरडे यांनी गोबरवाही पोलीस ठाण्यात अज्ञात पोकलँड मशीन चोरांविरूद्ध तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून गोबरवाही पोलिसांनी भादंवी ३७९, १८८ कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. सरकारी ताब्यातील दोन पोकलँड मशीनची चोरी झाल्याचे जिल्ह्यातील हे पहिलेच प्रकरण आहे. या प्रकरणाने प्रशासकीय यंत्रणेची धावपळ सुरू झाली आहे.
पोकलँड मशीनच्या माध्यमातून रेतीचे उत्खनन सुरू होते. त्यामुळे या दोन्ही मशीनवर कारवाई करण्यात आली. त्यासंबंधात पंचनामा केला. या पंचनाम्याचे सर्व कागदपत्रे पोलिसांना दिले आहे. पोकलँड चोरी प्रकरणात दोषींवर तातडीने कारवाई होण्यासाठी सहकार्य करू.
-गजेंद्र बालपांडे,
तहसीलदार तुमसर.