दोन रुपये सत्तावीस पैशांसाठी जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:26 AM2021-06-01T04:26:34+5:302021-06-01T04:26:34+5:30
३१ लोक ०७, ०८ के विशाल रणदिवे अडयाळ : तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम जोरात सुरू झाला आहे. दोन रुपये सत्तावीस ...
३१ लोक ०७, ०८ के
विशाल रणदिवे
अडयाळ : तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम जोरात सुरू झाला आहे. दोन रुपये सत्तावीस पैसे प्रति बंडल अशी अत्यल्प मजुरी मिळत असली तरी पोटासाठी जीव मुठीत घेऊन जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी जावे लागत असल्याची बोलकी प्रतिक्रिया या व्यवसायातील महिला मजुरांनी दिली.
पवनी तालुक्यातील नेरला, कलेवाडा, तिर्री, खैरी, शेगांव तथा अडयाळ व परिसरातील महिला वर्ग मोठ्या प्रमाणात तेंदूपत्ता संकलन करतात. यासाठी रोज पहाटेच्या सुमारास महिला या चमूने जंगलात जातात. कोणता हिंस्त्र प्राणी हल्ला चढविणार याचा काही नेम नाही; पण उदरनिर्वाहासाठी जीव मुठीत घेतला जातो.
कोरोना संकट काळात गावात मिळणारे रोजगार मिळेनासे व कमीही झालेत. हाताला जे काम मिळत आहे, त्यावर लक्ष केंद्रित करून प्रत्येक जण हे कामाच्या शोधात आहे. जंगल तथा ग्रामीण भागातील तेंदूपत्ता संकलन मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. यासाठी दिवसाला मोठ्या मेहनतीने कधी दीडशे, तर कधी दोनशे रुपये रोजी कमविण्याच प्रयत्न मजूर करीत असतात. पण, ते प्रत्येकाला शक्य होत नाही. कारण एका बंडलमध्ये ७० नग पाने असतात. नेरला येथील तेंदूपत्ता संकलन केंद्रात एकीकडे केंद्रचालक बंडल उलटी करून ठेवतात, तर दुसरीकडे महिलांनी दिवसभरात संकलन केलेली तेंदूपत्ता पानांची बंडले केंद्रावर मोजमाप करून घेत असतात.