लाेकसंख्या दोन हजार, लसीकरण केवळ १२६ जणांचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:38 AM2021-05-25T04:38:56+5:302021-05-25T04:38:56+5:30
राज्याच्या शेवटच्या टोकावर तुमसर तालुक्यात आदिवासीबहुल चिखली हे गाव आहे या गावाची लोकसंख्या सुमारे दोन हजार इतकी आहे. ...
राज्याच्या शेवटच्या टोकावर तुमसर तालुक्यात आदिवासीबहुल चिखली हे गाव आहे या गावाची लोकसंख्या सुमारे दोन हजार इतकी आहे. चिखली व देवनारा गावात आरोग्य विभागाने कोरोना लसीकरण करण्याकरिता सहा शिबिरे घेतली. परंतु त्यात केवळ १०८ नागरिकांनीच कोरोनाची लस घेतली. उर्वरित नागरिकांनी लस घेण्यास नकार दिला. तालुक्यातील इतर आदिवासीबहुल गावात अशीच स्थिती असल्याची धक्कादायक माहिती आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग मोठा असून यात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तुमसर तालुक्यात एकूण १३० गावे असून यात प्रत्येक गावात दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे प्रशासन व आरोग्य विभागात एकच खळबळ माजली.
कुरणापासून बचाव करता आरोग्य विभागाने प्रत्येक गावात लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले. त्याकरिता स्थानिक सरपंच, आरोग्यसेविका, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी,ग्रामसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी लसीकरणाकरिता पुढाकार घेतला. परंतु आदिवासीबहुल अनेक गावात आजही लसीकरणाला विरोध होत असून नागरिक लसीकरणाकरिता पुढे येत नाही. त्यामुळे लसीकरण करता आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आल्यापावली परत जावे लागते. तालुक्यातील चिखली या गावात अंधश्रद्धा व लसीमुळे मृत्यूची भीती हे प्रमुख कारण समोर आले आहे.
येथील सरपंच लक्ष्मण उईके यांनी ग्रामस्थांची समजूत काढली लसीमुळे मृत्यू होत नसून लस घेतल्याने कोरोनापासून उलट बचाव होतो परंतु त्यातही लोकांचे मन परिवर्तन झालेले दिसत नाही. आरोग्य सेविका देवाला मुंडले, कविता धुर्वे यांनीही घरोघरी जाऊन लोकांना लोकांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनाही यश आले नाही. लसीकरण करता आता येथे जिल्हा प्रशासनाने दखल घेण्याची गरज आहे.