शहरात दुचाकी गाड्यांचा ‘स्टॉक आऊट’
By admin | Published: April 1, 2017 12:36 AM2017-04-01T00:36:19+5:302017-04-01T00:36:19+5:30
भारत स्टेज फोर (बीएस-४) या निकषांचे पालन न करणाऱ्या वाहनांची विक्री १ एप्रिलपासून बंद होणार असल्याचा परिणाम भंडारा जिल्ह्यातही जाणवला.
बीएस-३ निकषाचा फटका : तीन दिवसांत ६५९ वाहनांची नोंद, ग्राहकांची गर्दी
भंडारा : भारत स्टेज फोर (बीएस-४) या निकषांचे पालन न करणाऱ्या वाहनांची विक्री १ एप्रिलपासून बंद होणार असल्याचा परिणाम भंडारा जिल्ह्यातही जाणवला. बीएस-४ च्या निर्णयामुळे मागील तीन दिवसांत उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे ६५९ दुचाकी वाहनांची विक्री झाल्याची नोंद झाली आहे. दुसरीकडे डिस्काऊंट आॅफर असल्यामुळे वाहन खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केल्याने दुचाकी गाड्यांचा आज शेवटच्या दिवशी स्टॉक आऊट होता.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे बीएस-४ उत्सर्जन निकषांची पालन न करणाऱ्या कोणत्याही वाहनांच्या म्हणजे प्रदुषण करणाऱ्या बीएस-३ वाहनाच्या नोंदणीला १ एप्रिल २०१७ पासून बंदी घालण्यात आली आहे. परिणामी बीएस-३ वाहनांची ३१ मार्चपुर्वी विक्री करुन आरटीओमार्फत नोंदणी होणे अतिआवश्यक होते.
वाहनांची खरेदी व्हावी या उद्देशापोटीही दूचाकी वाहन निर्मात्या कंपन्यांनीही दूचाकी खरेदीवर डिस्काऊंट आॅफर देवू केली होती. विविध कंपन्यांच्या दूचाकीसह चारचाकी वाहन खरेदीवरही डिस्काऊंट आॅफर होती. पंरतु जिल्ह्याच्या आर्थिक स्तर बघता, चारचाकी वाहनापेक्षा दूचाकी वाहन खरेदीवर ग्राहकांचा कल दिसून आला. परिणामी गुढीपाडव्याच्या सणापासून दूचाकी वाहनांच्या खरेदीमध्ये वाढ होत असल्याचे दिसून आले.
दूसरीकडे सर्वोच्च न्यायालयाचे दिशानिर्देश आल्याने ग्राहकांकडेही फक्त दोन दिवसांचा कालावधी शिल्लक होता. परिणामी डिस्काऊंट आॅफरचा लाभ मिळविण्यासाठी ग्राहकांनी शोरुममध्ये गर्दी केली होती.
भंडारा शहरात सर्वच कंपन्यांचे दूचाकी वाहनांचे शोरुम आहे. गुरुवार तथा शुक्रवारी ग्राहकांची गर्दी दिसून आली. उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे २९ मार्चला ३०९, ३० मार्चला ७६ तर शुक्रवारला २७४ दूचाकी वाहने खरेदी करण्यात आल्याची नोंद करण्यात आली.
दिवसभरात अनेक तरुण मंडळी आॅफरचा लाभ मिळविण्यासाठी शोरुमच्या येरझाऱ्या करीत होते. मात्र काही ठिकाणी दूचाकी वाहनांच्या स्टॉक समाप्त झाल्याने या तरुणांची निराशा झाली. तर कुठे शोरुम खुले असले तरी वाहन नसल्याचे सांगण्यात आले.
शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत आरटीओ कार्यालयात वाहन नोंदणीची कामे सुरु होती. दूचाकी वाहन खरेदीच्या माध्यमातून लक्षावधी रुपयांची उलाढालही झाली. (प्रतिनिधी)