वैनगंगा पुलावर तरुणीसह दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 10:26 PM2019-02-05T22:26:43+5:302019-02-05T22:27:26+5:30
लग्न जुळलेल्या पत्नीच्या मैत्रीणीला पाहुणचार करुन गावी पोहोचून देत असताना भरधाव ट्रेलरने दुचाकीला धडक दिल्याने तरुणीसह दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना येथील वैनगंगा नदी पुलावर मंगळवारी दुपारी २ वाजता घडली. सदर तरुणीचे लग्न १४ फेब्रुवारी रोजी पुणे येथे आयोजित होते. मात्र काळाने घाला घालून तिला हिरावून नेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लग्न जुळलेल्या पत्नीच्या मैत्रीणीला पाहुणचार करुन गावी पोहोचून देत असताना भरधाव ट्रेलरने दुचाकीला धडक दिल्याने तरुणीसह दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना येथील वैनगंगा नदी पुलावर मंगळवारी दुपारी २ वाजता घडली. सदर तरुणीचे लग्न १४ फेब्रुवारी रोजी पुणे येथे आयोजित होते. मात्र काळाने घाला घालून तिला हिरावून नेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मंजूषा एकनाथ ठवकर (२२) रा. टेकेपार माडगी ता. भंडारा आणि हरीचंद तुळशीदास इनवते (३२) रा. खराडी ता. भंडारा अशी मृतांची नावे आहेत. हरीचंदच्या पत्नीची मैत्रीण मंजूषा ठवकर हिचे लग्न जुळले होते. पत्नीच्या माहेरी राहणारी आणि बालपणाची मैत्रीण असल्याने तिला मंगळवारी खराडी येथे पाहुणचारासाठी बोलाविण्यात आले होते. पाहुणचार आटोपल्यानंतर मंजुषाला गावी सोडण्यासाठी हरीचंद तिला घेऊन आपल्या दुचाकीने टेकेपारकडे निघाला होता. दुपारी २ वाजता भंडारा शहरातील वैनगंगा नदीचा पुला पार करत असतांना समोरुन आलेल्या ट्रेलरने (एम एच ३४ एएम ५९७१) दुचाकीला धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, हरिचंदचा जागीच मृत्यू झाला. जखमी अवस्थेत मंजुषाला भंडाराच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापुर्वीच तिचाही मृत्यू झाला.
मंजुषा ठवकर ही पुणे येथे एका खाजगी कंपनीत नोकरीला होती. तिचे लग्न १४ फेब्रुवारीला पुणे येथेच आयोजित होते. भावी आयुष्याचे स्वप्न रंगवित असतांना ती आपल्या बालमैत्रिणीच्या घरी पाहुणचारासाठी आली होती. मात्र काळाने बेसावधपणे डाव साधला आणि तिचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती घरच्यांना होताच आसमंत भेदून टाकणारा टाहो फोडला. तर हरीचंद हा नागपूरजवळचा एका खाजगी कंपनीत नोकरीला होता. चार वर्षापुर्वीच त्याचे टेकेपार येथील तरुणीशी लग्न झाले होते. त्याच्या मागे पत्नी, मुलगी, आई, दोन भाऊ असा आप्त परिवार आहे. खराडी येथे अपघाताचे वृत्त येऊन धडकताच प्रत्येकजण हळहळ व्यक्त करतांना दिसत होता.
अर्ध्यावरती डाव मोडला...
मंजुषा ठवकर ही टेकेपारची तरुणी. पुण्यात एका खाजगी कंपनीत नोकरीला होती. घरच्यांनी योग्य स्थळ शोधून तिचे लग्न जुळविले होते. १४ फेब्रुवारीला लग्न निश्चित झाले होते. या लग्नाची तयारी तिच्या घरी जोरात सुरु होती. पत्रिका वाटप करणे सुरु होते. अशातच ती आपल्या बालमैत्रिणीच्या घरी पाहुणचारासाठी गेली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. सुखी संसाराचे स्वप्न एका क्षणात उध्वस्त झाले आणि अर्ध्यावरती डाव मोडला.