रानडुकराच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 10:37 PM2017-10-01T22:37:25+5:302017-10-01T22:37:42+5:30
कोका-खडकी मार्गावर दुचाकी चालकाला रानडुकराने धडक दिली. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. रविंद्र युवराज साठवणे (३५) रा. कोका असे मृत तरुणाचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : कोका-खडकी मार्गावर दुचाकी चालकाला रानडुकराने धडक दिली. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. रविंद्र युवराज साठवणे (३५) रा. कोका असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास घडली.
घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी तब्बल पाच तासांपर्यंत रस्ता रोखून धरला. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी वेळीच न पोहचल्याने तणाव वाढला. नागरिक व शासन प्रशासनात धुमश्चक्री चालली. वरिष्ठ वनाधिकारी व पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांचा ताफा दाखल झाला. अखेर आंदोलकासमोर अधिकाºयांनी चूक मान्य करीत मदतीचे आश्वासन दिल्याने पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ताब्यात घेतला.
कोका येथील रविंद्र साठवणे यांची कापड शिवण्याचा व्यवसाय खडकी येथे आहे. कामानिमित्त ते सकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास घरुन खडकी येथे जाण्यास मोटारसायकल क्र. एम एच ३६ एम ९६७८ ने निघाले. कोका ते खडकी दरम्यान प्रादेशिक वनविभागाचे जंगल असून सदर परिसर कोका वन्यजीव अभयारण्याच्या बफरझोनमध्ये मोडतो. कोका ते खडकी दरम्यान दुचाकीने जात असताना भरधाव वेगाने आडव्या दिशेत जाणाºया रानडुकराने दुचाकीला धडक दिली. त्यामुळे रविंद्र यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्यावर कोसळले. यात डोक्याला गंभीर दुखापत व रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच त्याचा मृत्यू झाला.
खडकी व कोका गावातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. करडी पोलीस विभागाचे पोलिस निरिक्षक तुकाराम कोयंडे यांनी घटनेचा पंचनामा केला. वरिष्ठ अधिकाºयांची वाट पाहत खडकी येथे दोन तास वाट पाहत असल्याने नागरिकांचाही संयमाचा बांध फुटला. जंगल भाग असल्यामुळे वन्यप्राण्यांचा हैदोस असतो. अशा स्थितीतही अधिकारी वेळेवर पोहचत नाहीत. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य के. बी. चौरागडे, कोकाचे जि.प. सदस्य उत्तम कळपाते, उपसभापती विलास गोबाडे, सरपंच भुपेंद्र पवनकर, नरविर टेकाम, रवी तिडके, हितेश सेलोकर यांच्या नेतृत्वात नागरिकांनी रस्ता रोखून धरला. तसेच मृतकाच्या कुंटबीयाला तात्काळ अर्थिक मदत करून एका सदस्याला नोकरी द्यावी, रस्त्याच्या दुर्तफा तारेचे कुंपण घालावे, दोषी वनाधिकाºयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी लावून धरली. नागरिकांनी यावेळी शासनाचा निषेध नोंदवित अधिकाºयांच्या कारभारावर असंतोष व्यक्त केला.
लोकांचा वाढलेला आक्रोश व मृतदेह उचलू न देण्याचा इशारा देण्यात आल्याने घटनास्थळी आ. चरण वाघमारे, अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, उपवनसरंक्षक हौश्ैिंग यांनी घटनास्थळी धाव घेत त्वरीत ८ लाखाची आर्थिक मदत घोषीत केली. तसेच २० हजार रूपयांची तत्काळ मदत देण्यात आली. मृताच्या पत्नीला वनविभागात तात्पुरती नोकरी तसेच अन्य मागण्यांचे लेखी आश्वासन यावेळी देण्यात आले.