दोन वर्षांनंतर शाळांत सुरू झाला किलबिलाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2022 05:00 AM2022-06-30T05:00:00+5:302022-06-30T05:00:25+5:30
कोरोना संसर्गामुळे गत दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या. काही शाळा सुरू करण्याचा प्रयत्न झाला; परंतु कोरोना नियमांचे कठोर पालन करावे लागत होते. परिणामी, शाळांमध्ये किलबिलाटच थांबला होता. मात्र, यावर्षी कोरोना संसर्ग नसल्याने पूर्ण क्षमतेने शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने घेतला. गत महिनाभरापासून शाळा प्रवेशोत्सवाची तयारी सुरू झाली. दि. २७ जून रोजी शिक्षक शाळेत पोहोचले. मात्र विद्यार्थ्यांसाठी २९ जूनचा मुहूर्त ठरविण्यात आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना संसर्गाने दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळांची घंटा बुधवारी वाजली आणि शाळा परिसर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने गजबजून गेला. शाळेत जाण्यासाठी उत्सुक असलेले विद्यार्थी शाळेत पोहोचले आणि एकच किलबिलाट सुरू झाला. कुठे ढोल-ताशांचा गजर तर कुठे गुलाबपुष्प उधळून विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षांसह शिक्षण सभापती आणि अधिकाऱ्यांनी विविध शाळांना भेटी दिल्या. दोन वर्षांनंतर जीवलग सवंगडी मिळाल्याने दिवसभर गप्पांचा फड रंगला होता.
कोरोना संसर्गामुळे गत दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या. काही शाळा सुरू करण्याचा प्रयत्न झाला; परंतु कोरोना नियमांचे कठोर पालन करावे लागत होते. परिणामी, शाळांमध्ये किलबिलाटच थांबला होता. मात्र, यावर्षी कोरोना संसर्ग नसल्याने पूर्ण क्षमतेने शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने घेतला. गत महिनाभरापासून शाळा प्रवेशोत्सवाची तयारी सुरू झाली. दि. २७ जून रोजी शिक्षक शाळेत पोहोचले. मात्र विद्यार्थ्यांसाठी २९ जूनचा मुहूर्त ठरविण्यात आला होता. त्यानुसार बुधवारी जिल्ह्यातील १३१३ शाळांमध्ये घंटा वाजली. विद्यार्थी मोठ्या उत्साहाने शाळेत पोहचले. त्याठिकाणी शिक्षक, गावकरी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे सांग्र संगीत स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांत उत्साह संचारला होता.
पहिल्या वर्गात १९ हजार ६८३ विद्यार्थी दाखल
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १३१३ शाळांमध्ये पहिल्या वर्गात १९ हजार ६८३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यात भंडारा तालुक्यातील २६५ शाळांतील ४८०७, लाखांदूर तालुक्यातील १४१ शाळांतील २६५४, लाखनी तालुक्यातील १४९ शाळांमध्ये ३५७४, मोहाडीच्या १५९ शाळांमध्ये २४०५, पवनीच्या १९६ शाळांमध्ये २०४५, साकोलीच्या १५८ शाळांमध्ये १९०८ आणि तुमसरच्या २४८ शाळांमध्ये २२९० विद्यार्थ्यांनी पहिल्या वर्गात प्रवेश घेतला आहे.
जि. प. अध्यक्ष पोहोचले कोंढाच्या शाळेत
- भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गंगाधर जिभकाटे बुधवारी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी पवनी तालुक्यातील कोंढा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पोहोचले. त्याठिकाणी आयोजित शाळापूर्व तयारी अभियान मेळाव्याला उपस्थित राहून शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तसेच दहावीतील गुणवंत विद्यार्थिनी तेजस्विनी सुरेश बावनकर हिचा सत्कार केला.
शिक्षण सभापती तुमसर तालुक्यात
- जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती रमेश पारधी यांनी बुधवारी तुमसर तालुक्यातील खापा, सिहोरा, सिंदपुरी, चुल्हाड, देवरीदेव, नकुल सुकळी, देवसर्रा, महालगाव, बिनाखी येथील जिल्हा परिषद शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य राजेश ढबाले, सुश्मा पारधी, पंचायत समिती सदस्य कांचन कटरे, बोरकर, भवसागर यांच्यासह माध्यमिक शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी मनोहर बारस्कर, गटशिक्षणाधिकारी विजय आदमने उपस्थित होते. तसेच उपाध्यक्ष संदीप ताले यांनीही विविध शाळांना भेट दिली.
सुरेवाडात घेतला मध्यान्ह भोजनाचा आस्वाद
- भंडारा तालुक्यातील सुरेवाडा येथे शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी मध्यान्ह भोजनाचा आनंद घेतला. तब्बल दोन वर्षांनंतर विद्यार्थ्यांची शाळेत पंगत रंगली होती. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रजनीश बन्सोड, पंचायत समिती सदस्य किशोर ठवकर, सोसायटी अध्यक्ष ताराचंद ढेंगे, राजकुमार मते, तुकाराम टांगले, जितेंद्र आंबागरे, इस्तारी राघोर्ते, विलास ढेंगे, कोमल भेदे, मुख्याध्यापक डी. एस. निपाने यांच्यासह शिक्षक व गावकरी उपस्थित होते.