मासे पकडणे अंगलट, दोन तरुणांचा तलावात बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 11:00 AM2023-04-05T11:00:05+5:302023-04-05T11:00:24+5:30
भंडारा जिल्ह्यातील मानेगावात आले होते बिऱ्हाडासोबत
लाखनी (जि. भंडारा) : बिऱ्हाडात मुक्कामास असलेल्यांपैकी दोन तरुण मासोळी पकडण्यासाठी मानेगाव शिवारातील गाव तलावात गेले होते. तेथे बुडून त्यांचा मृत्यू झाला. बिरजूसिंग उदयसिंग चित्तोडिया (२३) व क्रिष्णा रामसिंग चित्तोडिया (१८) (दोन्ही रा.आर्वी, जि.वर्धा. हल्ली मुक्काम मानेगाव /सडक) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली.
मानेगाव /सडक शिवारात आयुर्वेदिक औषधी विक्रीसाठी आर्वी येथील ८-१० कुटुंबीय आपल्या बिऱ्हाडासह काही दिवसांपूर्वी वास्तव्यास आले आहेत. आंघोळीसाठी गाव तलावात जात असल्याने त्यांना गाव तलावाची माहिती होती. मंगळवारला लाखनी येथील आठवडी बाजार असल्याने तंबूतील काही लोक औषधी विक्रीसाठी गेले होते. तर बिरजूसिंग व क्रिष्णा आपल्या तंबूवर होते. ते मासोळी पकडण्यासाठी गाव तलावात गेले होते. मासोळी पकडत असताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले.
ही बाब तेथे असलेल्या एका इसमाच्या लक्षात आली. त्याने आरडाओरड केली. बघ्यांची व गावकऱ्यांची गर्दी झाली. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला. घटनेची माहिती लाखनी पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक संजय कोरचे, सोनवणे, पोलिस हवालदार नीलेश रामटेके, गौरीशंकर कडव, पोलिस शिपाई सुनील मेश्राम पोहोचले. तपास लाखनी पोलिस करीत आहेत.
दोन दिवसांनंतर होते बिरजूचे लग्न
गाव तलावात बुडून मृत पावलेला बिरजूसिंग चित्तोडिया याचे अवघ्या दोन दिवसांनंतर बिऱ्हाडतच लग्न होणार होते. बिरजूच्या आकस्मिक मृत्यूने वर-वधू पक्षासह कुटुंबीयांवर शोककळा पसरली.