पिस्तूल, जिवंत काडतुसासह दोन तरुणांना अटक; तुमसर पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2022 04:41 PM2022-10-21T16:41:50+5:302022-10-21T16:43:03+5:30
आरोपीत मूळ पंजाबच्या तरुणाचा समावेश
तुमसर (भंडारा) : पिस्तूल, जिवंत काडतुसासह दोन तरुणांना अटक करण्याची कारवाई तुमसर तालुक्यातील मांगली येथे गुरुवारी सायंकाळी ६ वाजता करण्यात आली. त्यातील एक आरोपी मूळ पंजाबचा रहिवासी असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
संदीप रसपाल सिंह (३०) आणि करण देवदास तुमसरे (२३ दोघेही रा. रोहना, ता. तुमसर) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. संदीप सिंग हा मूळ पंजाबचा असून तो गत काही वर्षांपासून तुमसर तालुक्यात राहत आहे. तुमसर शहरालगत दक्षिणेला मांगली (खापा) येथे गुरुवारी सायंकाळी दोघेही दुचाकीने राधेश्याम बिसने यांच्या घरी आले होते. त्यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती तुमसर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी सापळा रचला. तेथे दोघांनाही ताब्यात घेतले. तेव्हा त्यांच्याजवळ पिस्तूल आणि जिवंत काडतूस आढळले.
आरोपी संदीप सिंह हा मूळ पंजाबचा असल्याने हत्यारांचे आंतरराज्यीय रॅकेट तर सक्रिय नाही ना असा संशय व्यक्त होते आहे. ही कारवाई तुमसरचे ठाणेदार नितीन चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात पाेलीस उपनिरीक्षक टेकाम व कुंभारे यांच्यासह पथकाने केली.