‘उज्ज्वला’ने दिली १७ हजार महिलांना धुरापासून मुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2017 12:36 AM2017-04-20T00:36:59+5:302017-04-20T00:36:59+5:30
सामान्य कुटुंबातील महिलांनाही स्वयंपाकाच्या धुरापासून मुक्ती मिळावी यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून सुरू झालेल्या ...
केंद्र शासनाची योजना : ३१ हजार ७०० पात्र कुटुंबांना लवकरच मिळणार गॅस कनेक्शन
भंडारा : सामान्य कुटुंबातील महिलांनाही स्वयंपाकाच्या धुरापासून मुक्ती मिळावी यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून सुरू झालेल्या प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचा भंडारा जिल्ह्यातील १७ हजार कुटुंबांना लाभ मिळाला आहे. यामुळे या महिलांना स्वयंपाकाच्या धुरापासून मुक्ती मिळणार आहे. जिल्ह्यातील ४१ हजार ३६१ कुटुंबांनी यासाठी अर्ज केले होते. त्यापैकी ३१ हजार ७०० कुटुंब पात्र ठरले असून या सर्व कुटुंबांना लवकरच गॅस कनेक्शन वितरीत केले जाणार आहे. प्रत्येक पात्र लाभार्थी कुटुंबाला प्रधानमंत्री उज्वला योजनेत गॅस कनेक्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
ग्रामीण भागातील वृक्षांची कत्तल थांबावी, हवेतील प्रदूषण कमी व्हावे व महिलांचे आरोग्य उत्तम राहावे या मुख्य उद्देशाने प्रधानमंत्री उज्वला योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दारिद्र्य रेषेखालील यादीत नाव असणे, रेशनकार्ड, आधारकार्ड, गाव नमुना ८ व अ विद्युत बिल इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. या योजनेत लाभार्थी कुटुंबातील महिला आहेत.
‘स्वच्छ इंधन बेहतर जीवन’ या उक्तीनुसार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने देशातील प्रत्येक गरीब कुटुंबाला नि:शुल्क गॅस कनेक्शन देण्यासाठी प्रधानमंत्री उज्वला योजना सुरू करण्यात आली आहे. स्वयंपाकाच्या धुराचा महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. ही बाब लक्षात घेवून धुरापासून मुक्ती देण्यासाठी प्रधानमंत्री उज्वला योजना देशभर राबविण्यात येत आहे. भंडारा जिल्ह्यात विविध गॅस वितरण कंपन्यांच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत आहे.
सामाजिक व आर्थिक जनगणना २०११ च्या यादीनुसार भंडारा जिल्ह्यात अंदाजे ५२ हजार कुटुंब संख्या असून जिल्ह्यात १ लाख ८८ हजार गॅस कनेक्शन कार्यरत आहेत. तरी सुद्धा गरजू व गरीब कुटुंबांकडे अद्यापही कनेक्शन नसल्याने गॅस कंपनीकडून सांगितले जात आहे. २०११ च्या यादीमधील ४१हजार कुटुंबांनी या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज भरले असून त्यापैकी ३१ हजार ६९९ अर्ज पात्र ठरले आहेत. उर्वरीत अर्जाची छाननी प्रक्रिया गॅस कंपनीकडून सुरु आहे. पात्र लाभार्थ्यांपैकी १६ हजार ८६१ कुटुंबांना प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचा लाभ देण्यात आला आहे.
सिलेंडरचे सिक्युरिटी डिपॉझीट १२५० रूपये, डीपीआरचे सिक्युरिटी डिपॉझिट १५० रूपये, सुरक्षा गॅस पाईप १०० रूपये, ग्राहक गॅस पुस्तिका २५ रूपये, आणि दस्तावेजकरण रूपये, ७५ असे एकूण १६०० रूपये नि:शुल्क असे या योजनेचे स्वरूप आहे. दोन बर्नरची शेगडीची किंमत अतिरिक्त ९०० रूपयांसाठी लोन सुविधा देण्यात येते. या सुविधेचा लाभ ५ हजार ७७१ कुटुंबांना देण्यात आला आहे. प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत वाटप करण्यास शिल्लक असलेले कनेक्शन गॅस एजंसीमार्फत तात्काळ शंभर टक्के लोन सुविधेसह वाटप करण्यात येणार आहे. या योजनेत लाभार्थ्यांकडून कुठलेही अतिरिक्त शुल्क घेण्यात येऊ नये, अशा सूचना गॅस एजंसीला देण्यात आलेल्या आहेत. गरजू कुटुंबांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. (नगर प्रतिनिधी)
सर्व पात्र लाभार्थ्यांना उज्वला योजनेचा लाभ मिळणार आहे. सामाजिक व आर्थिक जनगणना २०११ यादीत समावेश नसलेले परंतु जे गरजू आहेत, अशा लाभार्थ्यांकडून गॅस एजंसीधारकांनी अर्ज भरून घ्यावे व त्याची यादी तयार करावी व जिल्हा पुरवठा कार्यालयास सादर करावी, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.
- रमेश बेंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी भंडारा.