'उज्ज्वला'च्या डोक्यावर पुन्हा लाकडाची मोळी !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 12:33 PM2024-05-21T12:33:05+5:302024-05-21T12:33:52+5:30
महागाईमुळे सिलिंडर परवडेना : केरोसीनही मिळेना
लोकमत न्यूज नेटवर्क
किटाडी : कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच्या चिंतेतून दररोज रोजगार शोधावा लागतो. तो कधी मिळतो, तर कधी मिळतही नाही. दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. सध्या स्थितीत सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यातच गॅस सिलिंडरचे दरही हजाराच्या आसपास राहिल्याने अनेक गोरगरिबांचे बजेट बिघडत चालले असल्याचे दिसून येत आहे. केरोसीनचा पर्याय आहे. पण ते केरोसीनही आता मिळत नाही. अशा स्थितीत गोरगरिबांची चूल पेटणार तरी कशी? असा मोठा ग्रहण प्रश्न आहे.
केंद्र शासनाकडून राशन दुकानावर मिळणारे केरोसीन बंद झाल्यानंतर विविध घटकांमध्ये सर्वसामान्य महिलांसाठी आरोग्याच्या प्रश्न समोर ठेवून "उज्ज्वला" योजना शासनाने आणली. त्याअंतर्गत सध्या मोठ्या प्रमाणावर लाभार्थी आहेत. दरमहा त्यांना एक गॅस सिलिंडर मिळते. गॅस सिलिंडरचे अनेक वेळा दर वाढले. दर वाढल्यानंतर सबसिडी वाढायला हवी होती.
मात्र, तसे झाले नाही. हातावरील पोट असलेल्या कुटुंबांची गॅसच्या भरमसाठ वाढलेल्या किमतीमुळे दमछाक होताना दिसून येत आहे. त्यामुळे असंख्य 'उज्ज्वला' योजनेतील लाभार्थी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करू लागल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसू लागले आहे.
गॅस सिलिंडरच्या दरात तिपटीने वाढ
ग्रामीण भागातील महिलांना जंगलातून लाकडे आणून स्वयंपाक करावा लागतो. यामुळे महिलांना धुरापासून त्रास होतो. यापासून मुक्त्तीसाठी शासनाने घराघरात विविध शासकीय योजनेतून गरीब कुटुंबांना निःशुल्क गॅसजोडणी देण्यात आली. मात्र, मागील काही वर्षांत गॅस सिलिंडरच्या दरात तिपटीने वाढ झाली. महागाईमुळे अनेक गरीब कुटुंबात गॅस सिलिंडर शोभेची वस्तू ठरत आहे. तिपटीने वाढलेले गॅसचे दर कमी करण्याची गरज आहे.
सिलिंडरवर मिळणारी सबसिडी अत्यल्प
केंद्र सरकारने वर्षात १२ गॅस सिलिंडर सवलतीच्या दरात देण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला सबसिडी बऱ्यापैकी मिळत होती. मात्र, ही सबसिडी टप्प्याटप्प्याने अत्यल्प करण्यात आली. त्यातच गोरगरिबांना गॅसच्या वाढत्या किमतीत सिलिंडर घेणे परवडत नाही. त्यामुळे 'बाई आपली चूलच बरी' असा सूर सर्वसामान्य कुटुंबातील महिलांमधून उमटत आहे. खेड्यापाड्यातील महिला रानावनात जाऊन कोरडी लाकडे आणून त्यावर स्वयंपाक करून जेवण तयार करीत आहेत.