उमेद योजनांचा खासदारांनी घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:24 AM2021-07-08T04:24:03+5:302021-07-08T04:24:03+5:30
भंडारा : महिलांच्या सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी केंद्र शासन उमेद नावाचा प्रकल्प राबवित आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात निधीही दिला जातो. ...
भंडारा : महिलांच्या सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी केंद्र शासन उमेद नावाचा प्रकल्प राबवित आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात निधीही दिला जातो. भंडारा जिल्ह्यात उमेदच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या योजनांचा आढावा बुधवारी खासदार सुनील मेंढे यांनी घेतला. यावेळी त्यांनी योजना प्रभावीपणे राबविण्याची सूचना केली.
भंडारा जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित या बैठकीला जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सचिन पानझाडे, उमेदचे जिल्हा व्यवस्थापक गौरव तुरकर, साकोलीच्या नगराध्यक्ष धनवंता राऊत, दिशा समितीचे अध्यक्ष डाॅ. चाफले, भाजप पवनी तालुकाध्यक्ष मोहन सुरकर, भंडारा तालुकाध्यक्ष विनोद बांते, भोजराम कापगते, पवनी महिला मोर्चा तालुकाध्यक्ष माधुरी नखाते उपस्थित होते.
उमेदच्या माध्यमातून ग्रामपातळीवर रोजगार निर्मिती आणि लोकांच्या सबलीकरणाच्या दृष्टीने नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. कृषी सखी, बँक सखी, मत्स्य सखी अशा संकल्पना पूर्णत्वास जात आहेत. या सख्यांच्या माध्यमातून गावपातळीवर महिलांमध्ये जागृती आणण्याचा प्रयत्न होत आहे. महिलांचे सबलीकरण आणि त्या स्वत:च्या पायावर उभे राहावे, हा त्यामागचा उद्देश आहे, असे खासदार मेंढे यांनी सांगितले. अशावेळी खरोखरच या उपक्रमाचे गावपातळीवर काय परिणाम होतात, हे शोधणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. योजनांच्या माध्यमातून खर्च होणारा निधी गाव आणि लोकांच्या जीवनमान बदलण्यासाठी योजनेची यशस्विता गृहीत धरले जाईल, असे सांगितले.
योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. खर्च होणाऱ्या या निधीचा सकारात्मक परिणाम होतो की नाही, हे अधिकाऱ्यांनी पाहणे गरजेचे आहे. निधीचा विनियोग योग्य होत नसेल तर योजना यशस्वी होणार नाही. त्यासाठी प्रत्येकाने उमेद या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी परिश्रम घ्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. बैठकीत उमेदच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली.