अनधिकृत फलकांनी कोंडला चौकांचा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:41 AM2021-03-01T04:41:39+5:302021-03-01T04:41:39+5:30
या वर्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. सध्या निवडणुकीची आचारसंहिता लागायची आहे. त्यापूर्वी शहरात हौसे गौसे नौसेंसह ...
या वर्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. सध्या निवडणुकीची आचारसंहिता लागायची आहे. त्यापूर्वी शहरात हौसे गौसे नौसेंसह नेतेमंडळींचे बॅनर शहरात झळकू लागली आहेत. पालिकेने चौकाचौकात लावण्यात आलेल्या अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई केली आहे. मात्र ही कारवाई नाममात्र आहे. त्यानंतरही अनेक ठिकाणी फलक दिसून येत आहेत.
या अनधिकृत जाहिरात फलकांच्या विळख्याने वाहतुकीलाही धोका निर्माण झाला आहे. शहरातील गांधी चौक, राजीव गांधी चौक, शास्त्री चौक, जिल्हा परिषद चौक, त्रिमूर्ती चौक, नागपूर नाका यासह अनेक चौकांमध्ये फलकांची गर्दी वाढली आहे.
प्रमुख चौकांमध्ये तात्पुरते फलक लावण्यासाठी पालिकेच्या परवानगीची गरज असते. त्यासाठी विशेष शुल्क आकारण्यात आले आहे. तरीदेखील नियमांना तिलांजली देत अनेक ठिकाणी अनधिकृत फलके लावली जात आहेत. विविध कार्यक्रमांच्या जाहिरातीसाठी आयोजन फलक लावतात. त्यासोबत नेत्यांचे वाढदिवस, निवड, नियुक्ती आदींचे फलकही दररोज झळकत आहेत. फलकांच्या राजकारणात पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ निर्माण झाली आहे. जिल्ह्यात सध्या सभा, धार्मिक कार्यक्रम आदी विविध कार्यक्रमांच्या आयोजनाचे प्रमाण वाढले आहे.
बॅनरवर बॅनर लावण्याची चढाओढ होत असल्याने कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक ठिकाणी धार्मिक स्थळांसमोर फलक लावण्याची स्पर्धा असल्याने ही स्थळे फलकांमुळे दिसेनाशी झालेली दिसतात.
फलकांची वाढती संख्या लक्षात घेता शहरांचे विद्रूपीकरण झाले आहे. अनधिकृत फलकांवर कारवाईचे आदेश असले तरी नगरपालिका मात्र याकडे कानाडोळा करीत आहे. येत्या काळात फलकांवरून राजकीय वातावरण बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.