अनधिकृतपणे खोदकाम करणारी जेसीबी ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 10:41 PM2018-06-26T22:41:47+5:302018-06-26T22:42:01+5:30
आंतरराज्यीय सीमेवरील बपेरा गावात असणाऱ्या वन परिक्षेत्र कार्यालयाचे हद्दीत असणाऱ्या सोंड्या गावाचे शिवारात संरक्षित जंगलात अनधिकृत खोदकाम करताना जेसीबी मशिन आढळून आल्याने क्षेत्र सहाय्यकांनी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणात राजस्थानचे इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : आंतरराज्यीय सीमेवरील बपेरा गावात असणाऱ्या वन परिक्षेत्र कार्यालयाचे हद्दीत असणाऱ्या सोंड्या गावाचे शिवारात संरक्षित जंगलात अनधिकृत खोदकाम करताना जेसीबी मशिन आढळून आल्याने क्षेत्र सहाय्यकांनी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणात राजस्थानचे इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिहोरा परिसरात वनाचे विस्तारीत क्षेत्र आहे. यात संरक्षित जंगलाचे वाढते ढिग आहे. या संरक्षित जंगलात नव्याने शेतशिवार तयार करण्यासाठी धुडगुस सुरु झाली आहे. संरक्षित जंगलात वाढते अतिक्रमण असल्याने जंगलाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जंगलात वाढते अतिक्रमण असल्याने वन्य प्राण्यांचे मुक्त संचार धोक्यात आले आहे. बपेरा वन परिक्षेत्र कार्यालयाची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे. जंगलाचे रक्षण व मौल्यवान झाडाचे संगोपन करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे.
आंतरराज्यीय सीमा याच वन विभागाचे नियंत्रणात ठेवण्यात आली आहे.
या कार्यालयाचे अंतर्गत सोंड्या गावाचे बिट मध्ये वन आणि संरक्षित जंगलाचे क्षेत्र आहे. सोंड्या २ अंतर्गत कक्ष क्रमांक १० मधील संरक्षित वनात जेसीबी मशिनचे सहाय्याने खोदकाम करण्यात येत असल्याने वन रक्षकाला दिसून आले.
जेसीबी मशीनने खोदकाम करताना मौल्यवान वृक्षाची नासधूस करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान गेल्या काही वर्षापासून अन्य प्रांतातील लोकांचे वास्तव्य या परिसरात आहे.
रोजगाराकरिता त्यांचे वास्तव्य असले तरी शेतीविषयक कार्य करणारे उपकरण त्यांचे जवळ आहेत. नव्याने शेत शिवारांची दुरुस्ती कोणतीही सहानिशा न करता त्यांचे करवी करण्यात येत आहेत. संरक्षित जंगलाचे शेजारी अनधिकृत प्रवेश करीत जंगलातच जेसीबी ने खोदकाम करताना राजस्थानचे इसम दिसून आले.
जेसीबी क्र. आर..जे. २१ ईए १०२७ ही मशिन आधी ताब्यात घेण्यात आली आहे. जेसीबी मालकाचे नाव बाबूराव चौधरी असे असून जि. जोधपूर (राजस्थान) असल्याची नोंद वन विभागाचे कार्यालयात करण्यात आली आहे. चुल्हाड बसस्थानक परिसरात भाड्यांचे घरात परप्रांतीय लोकांचे वास्तव्य असल्याची माहिती मिळाली आहे.
बपेराचे वनपरिक्षेत्र कार्यालयात ही जप्त करण्यात आलेली जेसीबी मशिन ताब्यात ठेवण्यात आली आहे. संरक्षित जंगलात अनधिकृत प्रवेश व वृक्षाची अवैध तोड केल्याप्रकरणी बपेरा क्षेत्र सहाय्यक कार्यालयात बाबूराव चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई क्षेत्र सहाय्यक जी.डी. मरस्कोल्हे आणि बिट रक्षक एन.एस. कुंभरे यांनी केली. सहाय्यक वन संरक्षक अधिकारी कोडापे व वन परिक्षेत्राधिकारी ए.आर. जोशी यांचे मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक मरस्कोल्हे तपास करीत आहेत.