कोरंभी आबादी प्लॉटधारकांना शर्तभंगाची नोटीस

By admin | Published: March 28, 2017 12:22 AM2017-03-28T00:22:39+5:302017-03-28T00:22:39+5:30

भंडारा तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या कोरंभी देवी येथील आबादी प्लॉटधारक नागरिकांना भंडारा तहसीलदार यांनी शर्तभंगाची नोटीस बजावली आहे.

Uncertainty notice to corrupt population plots | कोरंभी आबादी प्लॉटधारकांना शर्तभंगाची नोटीस

कोरंभी आबादी प्लॉटधारकांना शर्तभंगाची नोटीस

Next

प्रशासनाविरुद्ध नागरिकांमध्ये रोष : कर न भरल्यास हद्दपार करण्याची धमकी, शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
भंडारा : भंडारा तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या कोरंभी देवी येथील आबादी प्लॉटधारक नागरिकांना भंडारा तहसीलदार यांनी शर्तभंगाची नोटीस बजावली आहे. यातील सुमारे ३० वहिवाटदारांना सव्वा ते दीड लाख रुपयांचा महसूल भरण्याची नोटीस बजावून ती न भरल्यास हद्दपार करण्याची कारवाई करण्याची धमकी यातून दिली आहे. यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरुद्ध असंतोष पसरला असून जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे यांनी याविरुद्ध आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कोरंभी येथे १९८५ - ८७ च्या दरम्यान प्रशासनाने गाव विस्तारीकरणांतर्गत गावातील गरजू लोकांना आबादी प्लॉटचे वाटप केले. त्यातील काही नागरिकांनी त्यांना मिळालेल्या प्लॉटवर वहीवाट करीत आहेत. तर काही नागरिकांनी चुकीच्या प्लॉटवर बस्तान मांडले आहे.यातील काहींनी नातेवाईकांना परस्पर प्लॉटचा हिस्सा दिला आहे. ही बाब जरी शासनाच्या शर्तभंगात येत असली तरी मागील ३० वर्षापासून येथील नागरिकांची वहिवाट असल्याने ते या जागेच्या आता हक्कदार झालेल्या आहेत. दरम्यानच्या काळात महसूल प्रशासनाने ही बाब चुकीची आहे असे मानून सदर नागरिकांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना बळ दिले. त्यामुळे अनेकांनी येथे बिनदिक्कत वहिवाट केली. या बाबीला प्रशासनच तेवढे जबाबदार आहे. हा मुद्दा जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे यांनी आज सोमवारला जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांच्याकडे लावून धरला आहे. या अन्यायाविरुद्ध वेळप्रसंगी शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी निवेदनातून दिला आहे.
आबादी विस्थापित केलेली जमीन ही शासनाने गैरकृषी केलेली नाही. सदर जागा ही शेतकऱ्यांकडून घेऊन त्यावर प्लॉट पाडून गरजूंना वाटप केले. वास्तविकता आजच्या दराने गैरकृषीची आकारणी तहसीलदार भंडारा यांच्या मार्फत करण्यात येत आहे. ही कारवाई चुकीची असल्याचे त्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना पटवून दिले.
भंडारा तहसीलदार यांनी कोरंभी येथील ३० कुटुंबांना शर्तभंग केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. यात त्यांना १५०० स्क्वे.फुट साठी सरासरी ७५ टक्के प्रमाणे १ लाख १५ हजार ते १ लाख ५० हजार रुपयापर्यंतचा दंड भरण्याची ताकीद दिली आहे. हा प्रकार चुकीचा असून भरमसाठ आकारणी करण्यात येत असल्याने याला कोरंभीवासीयांनी आता विरोध केला आहे. एकीकडी केंद्र व राज्य सरकार गरीबांना मोफत घर देण्याचे जाहीर करून सर्वांना हक्काचे घर मिळावे असा विश्वास व्यक्त करीत असताना कोरंभीवासियांना आता शर्तभंग केल्याप्रकरणी थेट हद्दपार करण्याची धमकी प्रशासनाने दिली असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
याप्रकरणी प्रशासनाने तातडीने हा निर्णय बदलवून दंडाची रक्कम अल्प स्वरुपात घ्यावी व ग्रामस्थांना न्याय द्यावा अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाच्या वेळी शिष्टमंडळात जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे, भंडारा शिवसेना शहर प्रमुख सूर्यकांत इलमे, गणेशपूरचे उपसरपंच यशवंत सोनकुसरे यांच्या नेतृत्वात रमेश माकडे, यशवंत टिचकुले, रणजित सेलोकर यांच्यासह अन्यायग्रस्त कोरंभीवासीय व शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

आमदार अवसरेंना घेराव
अन्यायग्रस्त कुटुंबिय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले. दरम्यान आमदार रामचंद्र अवसरे हे तिथे पोहचले असता या शिष्टमंडळासह नागरिकांनी अवसरे यांना घेराव घालून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची माहिती दिली. यावेळी आमदार अवसरे यांनी नागरिकांना हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
रमाबाई आंबेडकर वॉर्डाचाही प्रश्न
१९६२ मध्ये वैनगंगा नदीच्या पूरबाधीत लोकांचे विस्थापन गणेशपूर येथे रमाबाई आंबेडकर वॉर्डात करण्यात आले. या सर्व नागरिकांना भूमीस्वामीचे मालकी हक्काचे दस्तावेज देण्यात आले होते. प्रशासनाने या वॉर्डवासीयांना मालकी हक्क दिला. अशाही नागरिकांना तहसील कार्यालयाने दंडाची रक्कम भरण्याची नोटीस बजावली आहे. या चुकीच्या निर्णयाविरुद्ध नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.

शासनाने दिलेले भूखंड शासनाची पूर्व परवानगी न घेता विकली. ती नियमानुसार त्यांच्या नावावर करून देण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. नव्या रेडीरेकनर नुसार प्लॉटच्या किमतीच्या ७५ टक्के रक्कम भरणे गरजेचे आहे. ती रक्कम अत्यल्प आहे. त्यांना मोफत प्लॉट देणे शक्य नाही. शासनाच्या नियमानुसारच नोटीस बजावण्यात आली आहे.
-संजय पवार, तहसीलदार, भंडारा.
गणेशपूर येथील जुने गावठाण येथील भूमीअभिलेख गावठाण रेकॉर्डमधील शिट क्रमांक ९ मध्ये शासकीय जागेवर अंदाजे ३५ ते ४० वर्षांपासून नागरिकांची वहिवाट आहे. या सर्व नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे देण्यात यावे अशी मागणी ऐरणीवर आहे. कोरंभीवासियांच्या न्यायासाठी आंदोलन उभारू.
-जया सोनकुसरे, जि.प. सदस्य, भंडारा.

Web Title: Uncertainty notice to corrupt population plots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.