नात्याला काळिमा! चॉकलेटचे आमिष देत चुलत काकाचा सहा वर्षीय पुतणीवर अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 02:12 PM2023-01-25T14:12:41+5:302023-01-25T14:14:34+5:30
लाखनी तालुक्यातील घटना
लाखनी (भंडारा) : चॉकलेटचे आमिष देत पहिल्या वर्गात शिकणाऱ्या सहा वर्षीय पुतणीवर चुलत काकाने लैंगिक अत्याचार करण्याची घटना लाखनी तालुक्यातील एका गावात मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. उपचारासाठी बालिकेला भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मंगळवारी बालिका आपल्या घरी होती. वडील आणि आई कामावर गेली होती. वडील कामावर असताना घरून फोन आला, मुलगी खुर्चीवरून पडली असून तिला रक्तस्त्राव होत आहे. वडिलांनी घरी धाव घेऊन लाखनीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी मुलगी खुर्चीवरून पडली नसून तिच्यावर कोणीतरी लैंगिक आत्याचा केल्याचे सांगितले. त्यांनंतर मुलीला विचारले असता शेजारी राहणाऱ्या चुलत काकाने अत्याचार केल्याचे सांगितले.
दुपारच्या वेळी १६ वर्षीय चुलत काकाने चॉकलेटचे आमिष दाखवून घरी बोलावले आणि लैंगिक अत्याचार केले. घरी खुर्चीवरून पडल्याचे सांगण्यास चुलत काकानेच सांगितल्याचे बालिकेने यावेळी सांगितले. बालिकेची प्रकृती गंभीर असल्याने तिला डॉक्टरांनी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. या प्रकरणी भादंवि ३७६ (१), ३७६ (ए,बी) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम कलम ४, ६ अन्वये लाखनी ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अमोल तांबे करीत आहेत.