भरधाव कार चेकपोस्टच्या चौकीत शिरली; पोलीस उपनिरिक्षकासह दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 10:33 AM2020-06-06T10:33:26+5:302020-06-06T10:33:45+5:30
भरधाव कार अनियंत्रित होऊन चेकपोस्टच्या चौकीत शिरल्याने झालेल्या अपघातात पोलीस उपनिरीक्षकासह दोन जण जखमी झाले. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा तालुक्यातील खरबीनाका येथे शनिवारी सकाळी ७ वाजता घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भरधाव कार अनियंत्रित होऊन चेकपोस्टच्या चौकीत शिरल्याने झालेल्या अपघातात पोलीस उपनिरीक्षकासह दोन जण जखमी झाले. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा तालुक्यातील खरबीनाका येथे शनिवारी सकाळी ७ वाजता घडली. या अपघातात चेक पोस्टवरील आरोग्य कर्मचारी व इतर पोलिस थोडक्यात बचावले.
पोलीस उपनिरिक्षक विवेक राऊत (जवाहरनगर पोलीस ठाणे) व पोलीस शिपाई ननीर (पोलीस मुख्यालय) अपघातात जखमी झाले. दोघांच्याही पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना भंडाराच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वाहन तपासणीसाठी राष्ट्रीय महामार्गावरील खरबीनाका येथे चेकपोस्ट तयार करण्यात आला आहे. या चेक पोस्टवर आरोग्य कर्मचाऱ्यांसह पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी वाहनांची तपासणी सुरू होती.त्यावेळी नागपूरवरून एक भरधाव कार आली. तिला थांबण्याचा इशारा केल्यानंतरही ही कार थांबली नाही. तर अनियंत्रित होऊन कार थेट येथे उभारलेल्या पोलीस चौकीला धडक देऊन लगत असलेल्या नालीत जाऊन थांबली. अपघातात पोलीस उपनिरीक्षक विवेक राऊत आणि पोलिस मुख्यालयातील शिपाई ननीर जखमी झाले. याठिकाणी असलेले वैद्यकीय कर्मचारी व पोलिस अधिकारी थोडक्यात बचावले. कार नालीत अडकल्याने मोठा अनर्थ टळला. सदर कार आयुध निर्माणी कर्मचाºयाची असून ते नागपूरहून जवाहरनगर येथे जात असल्याचे सांगण्यात आले. अपघाताची माहिती होताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह जवाहरनगर पोलिसांनी अपघात स्थळी धाव घेतली.