घरकुलाच्या नावाखाली आता रेती चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 08:58 PM2019-01-06T20:58:42+5:302019-01-06T20:59:37+5:30
शासनाने घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती विना रॉयल्टी देण्याचे आदेश दिले. मात्र शासनाच्या आदेशाच्या गैरफायदा घेत अनेकजण रेतीची तस्करी करीत आहेत. वाहन पकडल्यास एखाद्या घरकुल लाभार्थ्याचे नाव सांगुन पळवाट शोधत आहेत.
मुखरु बागडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : शासनाने घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती विना रॉयल्टी देण्याचे आदेश दिले. मात्र शासनाच्या आदेशाच्या गैरफायदा घेत अनेकजण रेतीची तस्करी करीत आहेत. वाहन पकडल्यास एखाद्या घरकुल लाभार्थ्याचे नाव सांगुन पळवाट शोधत आहेत. या प्रकाराने आता पुन्हा रेती तस्करीत राजरोसपणे वाढ झाली आहे.
प्रधानमंत्री घरकुल योजनेसह विविध योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेकडो गोरगरीबांना घरकुल मंजूर झाले आहे. शासनाने निधीही उपलब्ध करुन दिला आहे. मात्र जिल्ह्यातील एकाही रेतीघाटाचा लिलाव झाला नसल्याने रेतीची अडचण निर्माण झाली होती. घरकुलाचे बांधकाम ठप्प झाले होते. त्यामुळे विविध पातळीवर पाठपुरावा करण्यात आला. घरकुल लाभार्थ्यांना दोन ब्रास रेती मोफत देण्याचे आदेश देण्यात आले. तर मुख्यमंत्र्यांनी लोक संवाद कार्यक्रमातून पाच ब्रास विनारॉयल्टी रेती देणार असल्याचे सांगितले. शासनाच्या उद्देश चांगला असला तरी त्यातून कसा करता येईल, यााच शोध अनेकजन घेत असतात. या गोरगरीबांच्या रेतीआड तस्करांनी खुलेआम रेतीचोरी सुरु केली आहे. लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरातील घरकुल लाभार्थ्यांना पळसगाव (दिघोरी) घाटातून दोन ब्रास रेती उपसण्याची परवानगी आहे. यात ग्रामसेवकाचा परवानगीची आवश्यकता होती. मात्र प्रत्यक्षात गरजुंच्या घरी जावून चौकशी न झाल्याने रेतीची तस्करी वाढली आहे. जिल्ह्यातील अनेक गावात आता अशा पध्दतीने रेतीची परस्पर विल्हेवाट लावली जात आहे.
चुलबंद खोऱ्यातील प्रत्येक रेती घाटावर ट्रॅक्टर बिनधास्तपणे रेतीची तस्करी करीत आहे.
घाटांची तपासणी गरजेची
लाखनी तालुक्याला रेती, मुरुम व अन्य गौण खनिजांची नैसर्गिक देणगी लाभली आहे. यातून शासनाच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात महसुल जमा होतो. परंतु अलीकडे स्थानीक रेती तस्कर खुलेआम रेती चोरी करीत आहेत. या सर्व घाटांची जिल्हाधिकाºयांनी तपासणी केल्यास मोठे घबाड समोर येण्याची शक्यता आहे.