धानशेती पाण्याखाली, अनेक घरांची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 01:12 AM2018-08-22T01:12:51+5:302018-08-22T01:13:12+5:30
जिल्ह्यातील सातही तालुक्यात अवघ्या २४ तासात अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली. नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक घरांची पळझड झाली. सर्वाधिक पाऊस लाखनी तालुक्यात झाला. या पावसाने अनेकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या वतीने नुकसानीची माहिती गोळा केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील सातही तालुक्यात अवघ्या २४ तासात अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली. नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक घरांची पळझड झाली. सर्वाधिक पाऊस लाखनी तालुक्यात झाला. या पावसाने अनेकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या वतीने नुकसानीची माहिती गोळा केली जात आहे.
साकोलीत ३९ घरांची पडझड
साकोली तालुक्यात सोमवारपासून जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसाने ३९ घरांची पडझड झाली. त्यात ३३ घरे अंशत:, पाच गोठे अंशत: आणि एक घर पूर्णत: कोसळले आहे. तालुक्यात सुदैवाने जीवीतहानी झाली नाही. साकोली तालुक्यात ९०.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आल्याची माहिती मंडळ अधिकारी एस.के. कारेमोरे यांनी दिली. तालुक्यातील कुंभली, खंडाळा, पळसगाव, सुकळी, महालगाव, सानगडी, सासरा, कलंधरा, वांगी, बोळदे, शिवणीबांध, झाडगाव, सावरबंध आदी गावांमध्ये घरांची पडझड झाल्याची नोंद आहे.
लाखनीत सर्वाधिक पाऊस
जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद लाखनी तालुक्यात १८५ मिमी करण्यात आली. तालुक्याला मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. पालांदूर परिसरात पावसाने अनेक पुल पाण्याखाली आले होते. मातीच्या घरांचे नुकसान झाले. दिवसभर या पावसामुळे वाहतूक ठप्प होती. पालांदूर मंडळांतर्गत ३३ घरे व एक गोठा पडून दोन लाख ३३ हजार रुपयांचे नुकसान झाले. बंडू खंडाईत रा.पालांदूर यांचे घर या पावसात कोसळले. तर मासळ परिसरात या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. खोलगट भागात पाणी साचले होते. मासळ, बाचेवाडी मार्गावरील पुलावरून पाणी वाहत होते. तर ब्रम्ही मार्गावरील रस्त्यावर एक ते दोन फुट पाणी साचल्याचे दिसत होते. मासळ येथील गोवर्धन गोंडाणे, रुपचंद गोंडाणे, तुळजाबाई मानकर, कुसुम पिल्लेवान, निर्मला गजघाटे, भास्कर चुटे यांच्या घराची पडझड झाली.
मोहाडी तालुक्यात पाणीच पाणी
मोहाडी तालुक्यात सर्वदूर भूभाग जलमय झाल्याचे दिसत आहे. नदी नाले ओढे तुडूंब भरून वाहत आहे. सूर नदीही दुथडी भरून वाहत आहे. तालुक्यात मोहाडी मंडळात ११६.५ मिमी, वरठी १२५.२ मिमी, आंधळगाव ९५.६ मिमी, कान्हळगाव ९०.२ मिमी, करडी ७६.५ मिमी आणि कांद्री येथे १७०.१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. या पावसामुळे धानपीक बुडाले आहे. रोहणा दहेगाव, मोहाडी चौंडेश्वरी, मोहाडी महालगाव, कान्हळगाव पिंपळगाव या नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे २५ ते ३० गावांचा संपर्क तुटला आहे. रोहणा येथील आबादी परिसर जलमय झाला असून पिकांचे व घरांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीची माहिती महसूल विभागाकडून गोळा करण्यात येत असल्याचे तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी सांगितले. तालुक्यात १२८ घरांची अंशत: नऊ घरे पूर्णत: तर सात गोठे या पावसात उध्वस्त झाली. नऊ जनावरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. उसर्रा येथील गोठ्यांची पडझड झाली आहे. भय्यालाल पारधी यांच्या गोठ्यांची पडझड होऊन २० हजार रुपये नुकसान झाल्याची माहिती आहे.
नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा - आमदार वाघमारे
जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे तुमसर व मोहाडी तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली. तहसीलदार व तलाठ्यांनी मुख्यालयी राहण्याचे निर्देश देत तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश आमदार चरण वाघमारे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
तुमसर तालुक्यात प्रचंड नुकसान
तुमसर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले. सिलेगाव, रनेरा येथील लहान नाल्यावर पाणी होते. तर तुमसर शहरातील विनोबा नगर, राजाराम लॉनमागील परिसर आणि मातोश्री शाळेजवळ पाणी साचले होते.
प्रशासनाने दिली ऐनवेळेवर शाळांना सुटी
हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. रात्रभर मुसळधार पाऊस बरसला. प्रशासनाने मंगळवारी सकाळी शाळा महाविद्यालयांना सुटी घोषित केली. मात्र सकाळच्या सत्रातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन पालक पोहचले होते. भर पावसात पालक आपल्या चिमुकल्यांना त्याठिकाणी घेऊन गेले. शाळेला सुटी असल्याचे तेथे गेल्यानंतर माहित झाल्याने मनस्ताप सहन करीत अनेक पालक आपल्या मुलांना घेऊन घरी परतले. शाळांनी पाठविलेले संदेशही पालकांपर्यंत व्यवस्थित पोहचले नाहीत. सोमवारीच शाळांना सुटी घोषित केली असती तर सकाळचा मनस्ताप सहन करावा लागला नसता असे अनेक पालकांनी सांगितले.