अनपेक्षितपणे वाजला जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2021 05:00 AM2021-11-27T05:00:00+5:302021-11-27T05:00:47+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार निवडणुकीच्या तारखांची सूचना जिल्हाधिकारी १ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करणार आहेत. संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरण्याचा कालावधी १ ते ६ डिसेंबर असून ७ डिसेंबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाणणी होईल. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख १३ डिसेंबर असून जेथे अपिल आहे तेथे १५ डिसेंबर ही अंतिम तारीख राहील.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : बहुप्रतीक्षित भंडारा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा शुक्रवारी अपपेक्षितपणे बिगूल वाजला आणि ग्रामीण राजकारण तापायला सुरूवात झाली. जिल्हा परिषदेचे ५२ गट आणि पंचायत समितीच्या १०४ गणांसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान होणार असून २२ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. तब्बल १६ महिने प्रशासक असलेल्या जिल्हा परिषदेवर आता सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोरोना संसर्गामुळे भंडारा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक स्थगित करण्यात आली होती. मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची मुदत संपल्याने १५ जुलै २०२० रोजी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. गत १६ महिन्यांपासून जिल्हा परिषदेवर प्रशासकाचे राज्य आहे.
आता कोरोना संसर्ग कमी झाल्याने सर्वांना निवडणुकीच्या घोषणेची प्रतीक्षा होती. मात्र एवढ्या लवकर ही घोषणा होईल, असे कुणालाही अपेक्षित नव्हते. गुरूवारीच सुधारित आरक्षण सोडत काढण्यात आली. तसेच २१ डिसेंबर रोजी नगरपंचायतीची निवडणूक असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लांबेल, अशी अपेक्षा होती. मात्र शुक्रवारी दुपारी राज्य निवडणूक आयोगाने भंडारा जिल्हा परिषद आणि सात पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा केली. अनपेक्षितपणे ही घोषणा झाल्याने इच्छुकांसह राजकीय पक्षांचीही धांतल उडाल्याचे दिसत होते.
१ डिसेंबरपासून नामांकनाला प्रारंभ
- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार निवडणुकीच्या तारखांची सूचना जिल्हाधिकारी १ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करणार आहेत. संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरण्याचा कालावधी १ ते ६ डिसेंबर असून ७ डिसेंबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाणणी होईल. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख १३ डिसेंबर असून जेथे अपिल आहे तेथे १५ डिसेंबर ही अंतिम तारीख राहील. निवडणूक चिन्हांचे वाटप १३ डिसेंबर तर अपिल असलेल्या ठिकाणी १५ डिसेंबर रोजी करण्यात येईल. २१ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते ५.३० पर्यंत मतदान होणार असून २२ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
उमेदवारीसाठी सर्वच पक्षात रस्सीखेच
- भंडारा जिल्हा परिषदेची गतवेळी ४ जुलै २०१५ रोजी निवडणूक झाली होती. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने संयुक्त सत्ता हस्तगत केली होती. काँग्रेसचे २०, राष्ट्रवादीचे १५, भाजपचे १२, शिवसेनचा एक आणि अपक्ष चार असे ५२ सदस्य निवडूण आले होते. त्यावेळी काँग्रेसकडे अध्यक्ष पद गेले होते. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत युती-आघाडीचा संभ्रम असून सर्वच पक्ष स्वतंत्र लढण्याच्या मानसीकतेत आहेत. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. सर्वच पक्षात उमेदवारीसाठी रस्सीखेच दिसत आहे.
५२ गट व १०४ गणांत रणधुमाळी
- भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ गटात आणि सात पंचायत समितीच्या १०४ गटात आता रणधुमाळीला सुरवात होणार आहे. भंडारा तालुक्यात जिल्हा परिषदेचे दहा गट असून पंचायत समितीचे २० गण आहे. मोहाडी तालुक्यात सात गट आणि १४ गण, साकोली तालुक्यात सहा गट आणि १२ गण, तुमसर तालुक्यात १० गट आणि २० गण, लाखनी तालुक्यात सहा गट आणि १२ गण, पवनी तालुक्यात सात गट आणि १४ गण तर लाखांदूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे सहा गट आणि पंचायत समितीचे १२ गट आहेत.