विनापरवानगी महावितरणने केली वृक्षांची छटाई

By admin | Published: July 8, 2017 12:33 AM2017-07-08T00:33:07+5:302017-07-08T00:33:07+5:30

राज्य शासनाने ४ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवून वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली आहे.

Unprivileged MSEDC | विनापरवानगी महावितरणने केली वृक्षांची छटाई

विनापरवानगी महावितरणने केली वृक्षांची छटाई

Next

तीन तास वीज पुरवठा खंडित : गणेशपूर, विद्यानगर परिसरातील प्रकार
प्रशांत देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्य शासनाने ४ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवून वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली आहे. संपूर्ण राज्य वृक्ष लागवडीत गुंतलेले असताना भंडारा शहरात महावितरणने शुक्रवारी विद्युत तारांवर झाडांच्या फांद्या आल्याच्या कारणास्तव हिरव्या झाडांच्या फांद्यांची कत्तल केली. यासाठी महावितरणने विद्यानगर फिडरवरून सुमारे तीन तास विद्युत पुरवठा खंडित केला होता. वृक्षांच्या फांद्या छटाई किंवा वृक्ष कटाईची परवानगी वनविभागाकडून घेतलेली नाही, हे विशेष.
वीज वितरण कंपनीच्या वतीने नागरिकांना नागरी सुविधा पुरविणे गरजेचे आहे. याचाच एक भाग म्हणून आज ही वृक्ष छटाई करण्यात आल्याचे आता महावितरणकडून सांगण्यात येत आहे. वनविभागावर वृक्ष संवर्धन व लागवडीची जबाबदारी सोपविलेली आहे. राष्ट्रीय महामार्गावरसह गणेशपूर परिसरातील रस्त्यालगतच्या वृक्षांची कटाई व छटाई करण्यात आली. ही कामे महावितरणने पावसाळ्यापूर्वी करणे गरजेचे होते. मात्र, त्यांना आता ऐन पावसाळ्यात जाग आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कारधा उपकेंद्रातून वीज पुरवठा होतो. यावरून विद्यानगर येथील फिडरवरून गणेशपूर व विद्यानगर परिसरात वीजेचा पुरवठा नागरिकांना करण्यात आलेला आहे. दक्षिण क्षेत्रात मोडणाऱ्या हे कार्यक्षेत्र मागिल काही दिवसांपासून काही ना काही कारणाने वादग्रस्त राहत आहे. त्यात आणखी आज भर पडली. वृक्ष कटाई किंवा छटाईची वनविभागाला महाविरणने परवानगी मागितलेली नाही. विना परवानगी महाविरतणने आज सकाळपासूनच गणेशपूर येथील अखिल सभागृह परिसरातून ही वृक्ष कटाई व छटाई सुरू केली ती जिंदल पेट्रोलपंप पर्यंत केली. यासाठी महावितरणच्या दक्षिण क्षेत्राधिकाऱ्यांनी गणेशपूर ते विद्यानगर परिसरातील विद्युत पुरवठा सकाळी ७.३० वाजतापासून बंद केला तो सकाळी १०.३० पर्यंत. सध्या सकाळी ७ वाजताचे विद्युत भारनियमण बंद झाल्याने अनेकांना वाटले की, थोड्या वेळात विद्युत पुरवठा सुरळीत होईल. मात्र, आता म्हणता म्हणता तब्बल तीन तासानंतर वीज पुरवठा सुरळीत झाला.
दरम्यानच्या काळात दक्षिण क्षेत्राचे सहाय्यक अभियंता लिमजे यांनी चार मजूरांसह गणेशपूर ते राष्ट्रीय महामार्गावरील विद्यत तारांवरील वृक्षांच्या फांद्या तर काही ठिकाणी वृक्ष कटाई करण्याचा धडाका सुरू ठेवला होता. यासाठी वनविभागाची परवानगी आवश्यक असताना तशी कुठलीही परवानगी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही. सोबतच सदर काम करण्यात येत असल्याने वीज ग्राहकांना त्रास होईल, याची पूर्वसूचना नागरिकांना देणे गरजेचे होते. याबाबत महावितरणने वर्तमानपत्रात जाहिरात देऊन नागरिकांना सुचीत करण्याच्या प्रकारालाही बाजूला ठेवून ही वृक्ष कत्तल केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत सहाय्यक अभियंता लिमजे यांना विचारणा केली असता, त्यांनी वनविभागाची परवानगी घेतली नाही, व वीज ग्राहकांना सूचना देण्याची गरज भासली नसल्याचे प्रतिक्रिया ‘लोकमत’ला दिली.

Web Title: Unprivileged MSEDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.