विनापरवाना वृक्षतोडीचे प्रमाण वाढले
By admin | Published: May 12, 2016 12:51 AM2016-05-12T00:51:33+5:302016-05-12T00:51:33+5:30
काही दशकापूर्वी घनदाट वनसंपदा लाभलेल्या ग्रामीण तथा शहरी भाग आज वृक्षतोडीच्य प्रमाणात वाढ झाल्याने वाळवंटाकडे वाटचाल करीत आहे.
अड्याळ : काही दशकापूर्वी घनदाट वनसंपदा लाभलेल्या ग्रामीण तथा शहरी भाग आज वृक्षतोडीच्य प्रमाणात वाढ झाल्याने वाळवंटाकडे वाटचाल करीत आहे. इंधन उपलब्ध नसल्याने सरपणाकरिता तसेच पहेला परिसरातील बऱ्याच गावातील शेतकऱ्यांची शेतजमीन गोसीखुर्द येथील धरणांतर्गत बाधित झाल्याने त्या शेतजमिनीतील वृक्ष शेतकरी कंत्राटदारांना विकत आहेत.
इमारतीचे लाकूड व फर्निचर बनविण्यासाठी जंगलातील बहुमुल्य वृक्षांची कत्तल होत आहे. भंडारा तालुक्यात वृक्ष लागवड ही अत्यल्प असल्याने वृक्षतोडीच्या गंभीर परिणामाला सामोरे जावे लागणार आहे. ५० वर्षांपूर्वी भंडारा तालुक्यात जळावू लाकडे मोठ्या प्रमाणात मिळत होती. आज ती मिळणे दुर्मिळ झाली आहेत. त्यात खापा, रावणवाडी, बोरगाव, एटेवाही, पागोरा, मिन्सी इत्यादी गावे जंगलात व्यापली आहेत. जंगलमाफिया, लाकूड ठेकेदार हे वनाधिकाऱ्यांना हाताशी धरून वृक्षतोड करून पैसा कमावित आहेत. याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. एकीकडे शासन वृक्षलागवडी वर करोडो रुपये खर्च करीत आहेत. परंतु पाहिजे त्या प्रमाणात वृक्ष उभे दिसत नाही. ते फक्त कागदोपत्रीच दिसत आहे. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे. जंगल क्षेत्रात भटकंती केली तर हजारो वाळलेले वृक्ष भुईसपाट झालेली दिसत आहेत. वृक्ष कटाईवर नियंत्रण आणणे गरजेचे झाले आहे. आजस्थितीत जंगलावर उपजीविका करणारी आणि अवैध वृक्षतोड करणारी माणसे बेधडक जंगलाचे वाळवंट करीत असून वाळलेल्या लाकडासह नवीन झाडेही तोडू लागली आहेत. (वार्ताहर)