जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 12:34 AM2019-03-04T00:34:30+5:302019-03-04T00:34:56+5:30

जिल्ह्यात आठवड्याभरानंतर पुन्हा अवकाळी पावसाने रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास दमदार हजेरी लावली. जिल्ह्यातील पाच तालुक्यात पाऊस बरसल्याची माहिती असून या पावसामुळे रबी पिकांना मोठा फटका बसला आहे.

Unseasonal rains in the district | जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका

जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका

Next
ठळक मुद्देरबी पिकांना फटका : बोथली गावाजवळ कोसळले वृक्ष, धानाची पोती भिजल्याने बळीराजाचे वाढले टेंशन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात आठवड्याभरानंतर पुन्हा अवकाळी पावसाने रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास दमदार हजेरी लावली. जिल्ह्यातील पाच तालुक्यात पाऊस बरसल्याची माहिती असून या पावसामुळे रबी पिकांना मोठा फटका बसला आहे. यात लाख, लाखोरी, चणा, हरभरा, गहू पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. भंडारा शहरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते.
लाखांदूर, तुमसर, मोहाडी, साकोली तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. वादळामुळे वरठी ते मोहाडी राज्य मार्गावरील झाडे कोलमडून पडली. मोहाडी-भंडारा राज्यमार्गावरील बोथलीजवळ बाभळीचे झाड कोसळल्याने वाहतूक सकाळपासून ठप्प होती. क्रेनच्या सहायाने झाड बाजूला करून व मजुरांकरवी झाड कापून रस्ता मोकळा करण्यात आला.
तुमसर : शनिवारी मध्यरात्री अवकाळी पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात धानाची पोती भिजली. शेतकरी वर्गाचे येथे मोठे नुकसान झाले. काही व्यापारी बाजार समितीतून धानाची खरेदी करतात. त्याचीही धान पोती भिजल्याचे समजते. पूर्व विदर्भात प्रसिध्द बाजार समिती असूनही शेतकऱ्यांचा धान येथे उघड्यावर ठेवला जातो.
शनिवारी मध्यरात्री तुमसर शहर व तालुक्यात अवकाळी पाऊसाने सुमारे एक तास झोडपले. अचानक पाऊस बरसल्याने तारांबळ उडाली. तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खुल्या मार्केट यार्डात धानाची पोली ओलिचिंब झाली. सदर धान शेतकऱ्यांचे होते अशी माहिती आहे. धान ओले झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. पुन्हा ते धान उन्हात वाळू घालावे लागणार आहे. एकदा धान पाण्यात भिजले तर त्याची किंमत कमी होते. धान भरडाई वेळी तो तुटतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते.
बाजार समितीचा मार्केड यार्ड मोठा असून बाजार समिती श्रीमंत आहे. अनेक बांधकामे येथे करण्यात आली. प्रवेशद्वारावर येथे पैसा खर्च करण्यात येत आहे. किमान धान तथा इतर पिकांच्या सुरक्षेकरिता शेडची व्यवस्था करण्याचे नियोजन बाजार समितीने करण्याची गरज आहे. बाजार समितीने शेतकºयांचे हित जोपासने गरजेचे आहे.
साकोली : रविवारी सकाळी बरसलेल्या अवकाळी पावसामुळे रबी पिकाचे नुकसान झाले आहे. आधीच सुलतानी संकट डोक्यावर असतांनी त्यातच अस्मानी संकटाचा सामना बळीराजाला करावा लागत आहे.
रविवारी पहाटे साकोली तालुक्यात पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे हरभरा, उडीद, मुंग, लाख-लाखोरी आदी पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. साकोली तालुक्यातील धान खरेदी केंद्र हाऊसफुल झाले आहेत. नुकतीच मुख्यमंत्री फडणवीस यांनी धानाला ५०० रुपये प्रती क्विंटल बोनसची घोषणा केली. त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनी धान विक्रीस पुन्हा सुरुवात केली. त्यामुळे आधीच हाऊसफुल झालेले धानाच्या गोडाऊनमध्ये जागा अपूरी असल्यामुळे बऱ्याच धान केंद्रावर बाहेर ढेवलेले धान ओले झाले. तर बºयाच शेतकºयांनी गहु तोडला आहे. या पावसामुळे जमा केलेला गहू खराब होण्याची शक्यता आहे.
मागील महिन्याभरापासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका बसन्याची ही तिसरी वेळ आहे. वारंवार अस्मानी संकटाला सामना देत बळीराजाचे टेन्शन वाढत आहे. दुसरीकडे उन्हाळा सुरुहोताच विटा व्यवसायीकांचेही चांगले दिवस येतात. मात्र अवकाळी पावसामुळे विटाभट्टी चालकांचे नुकसान झाले आहे.
शासनाने शेतकऱ्यांसह विटभट्टी चालकांच्या नुकसानी संदर्भात पंचनामा करुन आर्थिक मदत द्यावी, अशी मुख्य मागणी आहे. दुसरीकडे धान खरेदी केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

Web Title: Unseasonal rains in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस