अवकाळी पावसाचा फटका, भाजीपाल्याचे दर निम्म्याने कोसळले
By युवराज गोमास | Published: December 2, 2023 04:37 PM2023-12-02T16:37:11+5:302023-12-02T16:37:50+5:30
शेतकरी संकटात फुलकोबी ३० रुपये तर मेथी, पालक दहाला एक.
युवराज गोमासे,भंडारा : महिन्याभरापूर्वी तसेच दिवाळीत भाजीपाल्याचे दर वधारले होते. परंतु, दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने आता भाव चांगलेच गडगडले आहेत. ६० ते ८० रुपये किलोने विकली जाणारी फुलकोबी निम्म्याने घसरली ३० रूपये किलो दराने विकली जात आहे. शेतकऱ्यांकडून २० रुपये किलो दराने खरेदी केली जात आहे. किलोने विकली जाणारी मेथी व पालक आता दहा रुपये किलो दराने खरेदी केली जात आहे. अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणाचा फटका भाजीपाला उत्पादकांना चांगलाच बसला आहे. आवक वाढल्याने दर घसरले आहेत.
दिवाळीत भाजीपाल्याचे दर वाढल्याची ओरड करणारे आता शेतकऱ्यांची व्यथा समजून घेताना दिसत नाहीत. उलट भाजीपाला स्वस्त असतानाही आणखी तोलमोल केला जात आहे. मात्र, उत्पादन खर्च वाढलेला असताना निम्म्या दरात भाजीपाला विकणे आम्हाला कसे परवडेल, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.
यंदा सणासुदीच्या काळातही भाजीपाला दरात थोडीशी वाढ झाली होती. त्यातही भाजीपाल्याचे उत्पादन जेमतेम होत असल्याने शेतकऱ्यांना म्हणावा तसा फायदा झाला नाही. आता भाजीपाल्याचे उत्पादन बऱ्यापैकी वाढले असताना बाजारात शेतकऱ्यांचा माल कवडीमोल दराने घेतला जात आहे. टोमॅटोसह सर्वच भाज्यांची अल्पदरात शेतकऱ्यांकडून खरेदी केली जात आहे.
तुरीच्या शेंगा बाजारात उपलब्ध-
बाजारात आता तुरीच्या शेंगा दाखल होऊ लागल्या आहेत. ६० ते ८० रुपयांचा दर मिळतो आहे. या शेंगांच्या भाजीवर अनेकांचा जोर असतो. शेतात काम करणारे कामगार तर पुढील दोन महिने याच शेंगांच्या दाण्यांची भाजी खातात. करडई, हरभऱ्याच्या भाजीचाही वापर या दिवसांत वाढतो. त्यामुळे भाज्यांची मागणी घटत असल्याने दरावर परिणाम होत आहे.
सध्या ठोक बाजारात भाजीपाल्याचे दर घसरले आहेत. परंतु, दर वाढले की लोक ओरड करू लागतात. मात्र, दर घसरल्यास त्यांना शेतकऱ्यांचा विचार येत नाही. सध्या भाजीपाल्याचे दर गडगडल्याने शेतकऱ्यांबरोबर किरकोळ व्यापाऱ्यांचा नफाही घटला आहे. त्रास व खर्च मात्र सारखाच आहे.- फुलचंद बांते, भाजीपाला विक्रेता.
भाजीपाला पिकांसाठी खर्चाचे बजेट वाढले आहे. त्यातच वन्यप्राणी व कीड तसेच रोगांपासून पिकांच्या रक्षणासाठी रात्र रात्र थंडीत जागावे लागते. परंतु, आता दर घसरल्याने ग्राहकांना आमचा त्रास दिसत नाही का? ग्राहकांना केवळ स्वस्त भाजीपाला हवाय का, इतर वस्तूंच्या बाबतीत विचार का होत नाही?.
- रामभाऊ नेरकर, शेतकरी.
व्यापारी खातात मलाई-
शेतकऱ्यांकडून अल्पदराने भाजीपाला खरेदी होत असला तरी ग्राहकांना मात्र त्याचा फायदा होत नाही. शेतकऱ्यांकडून २० रुपये किलो दराने खरेदी केली जाणारी फुलकोबी ग्राहकांना मात्र ४० ते ६० रुपये किलो दराने विकली जाते. ४० रुपये किलोने खरेदी होणारा शेवगा ८० रुपये किलो दराने, १० रुपये दराने खरेदी होणारी पालक भाजी ४० रुपये किलो दराने ग्राहकांना विकली जाते. व्यापारी मलाई खाताना दिसून येतात.
किरकोळ बाजारातील भाजीपाल्याचे दर -
भाजीपाला दर रुपये
फुलकोबी ३०
मिरची ४०
टोमॅटो २०
वांगे ३०
पत्ता कोबी २०
भेंडी ३०
पालक १० रुपये जुडी
सांभार १० रुपये जुडी
मेथी १० रुपये जुडी
लाल भाजी १० रुपये जुडी