भंडाऱ्यात वादळी पावसासह गारपिटीचा तडाखा; तीस घरांचे अंशत: नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2022 10:28 AM2022-05-16T10:28:09+5:302022-05-16T17:37:08+5:30
साकोली तालुक्याच्या एकोडी येथे रात्री गारांसह वादळी पावसाने हजेरी लावली. मोहाडी तालुक्यातील करडी परिसरात जोरदार वादळ सुटले. तर, भंडारा शहरात सोमवारी पहाटे पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.
भंडारा : अचानक आलेल्या वादळाचा जिल्ह्याला रविवारी रात्री माेठा तडाखा बसला. साकाेली तालुक्यातील एकाेडी येथे रात्री बाेराच्या आकारांचा गारांचा वर्षाव झाला तर परिसरातील गावातील ३० घरांचे अंशत: नुकसान झाले. माेहाडी तालुक्यातील करडी परिसरालाही वादळाचा तडाखा बसला असून अनेक घरावरील छप्पर उडून गेले. काही गावांत वीज खांब आणि वृक्ष उन्मळून पडले. तर शेतात असलेल्या धान पिकाचे नुकसान झाले.
रविवारी रात्री अचानक वादळी वाऱ्याला प्रारंभ झाला. विजांच्या गडगडाटात माेठ्या थेंबाच्या पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर वादळी पाऊस काेसळत हाेता. वीज पुरवठा खंडित झाल्याने परिसरात सर्वत्र अंधार पसरला हाेता. माेहाडी तालुक्यातील करडी, देव्हाडा, मुंढरी, निलज, पालाेरा, ढिवरवाडा, मांडवी, खमारी, माडगी, ढाेरवाडा, सुकळी काेका, काेथुर्णा, बेटाळा या गावांना वादळाचा माेठा तडाखा बसला आहे. अनेक घरांवरील छप्पर उडून गेले.
साकाेली तालुक्यातील एकाेडी परिसरातील बाम्पेवाडा, उमरझरी, एकाेडी, खांबा, जांभळी या गावांना माेठा तडाखा बसला. सुमारे ३० घरांचे अंशत: नुकसान झाले. एकाेडी मंडळात ४३ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. नुकसान झालेल्या सर्व घरांचे पंचनामे करण्यात येत आहे. वादळामुळे रस्त्यावरील अनेक वृक्ष उन्मळून पडले हाेते.
एकाेडी येथे गारांचा वर्षाव
साकाेली तालुक्यातील एकाेडी येथे रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास जाेरदार वादळ झाले. या वादळासाेबतच बाेराचा आकाराच्या गारांचाही वर्षाव झाला. शेतात असलेल्या उन्हाळी धानाच्या पिकाचे माेठे नुकसान झाले. कापून ठेवलेल्या धानाच्या गंजा ओल्या झाल्या आहेत. शासनाने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आहे.
मुंढरी येथे झाडावर वीज काेसळली
माेहाडी तालुक्यातील मुंढरी येथे एका आंबाच्या झाडावर वीज काेसळून झाड पूर्णत: जळून गेले. ज्ञानेश्वर गाेंधुळे यांच्या घराशेजारी झाडावर रात्री ११.३० वाजताच्या सुमारास अचानक वीज काेसळली. प्रचंड कडकडाट झाल्याने नागरिक भयभीत झाले. सुदैवाने या विजेमुळे घरांना आग लागली नाही.