राज्य महामार्ग बांधकामात मातीमिश्रित मुरमाचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:07 AM2021-03-04T05:07:19+5:302021-03-04T05:07:19+5:30
प्रकरण साकोली-वडसा मार्ग बांधकामाचे लाखांदूर : चार वर्षांपूर्वी मंजूर व सध्या बांधकाम प्रगतीत असलेल्या साकोली-वडसा या राज्य महामार्ग बांधकामात ...
प्रकरण साकोली-वडसा मार्ग बांधकामाचे
लाखांदूर : चार वर्षांपूर्वी मंजूर व सध्या बांधकाम प्रगतीत असलेल्या साकोली-वडसा या राज्य महामार्ग बांधकामात शासन व प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षाने थेट मातीमिश्रित मुरमाचा वापर केला जात असल्याची ओरड जनतेतून होत आहे. सदर बांधकामात निकृष्ट खनिजांचा वापर केला जात असताना कंत्राटदार कंपनीविरोधात कार्यवाहीसाठी शासन, प्रशासन धजावत नसल्याने जनतेतून कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे.
प्राप्त माहितीनुसार नोव्हेंबर २०१७ मध्ये साकोली-वडसा या लाखांदूर तालुका सीमावर्ती भागापर्यंत जवळपास २६६ कोटी रु. निधीचे राज्य महामार्ग बांधकाम मंजूर करण्यात आले. सदर बांधकामाचे पुढील दोन वर्षांत बांधकाम पूर्ण करण्यासाठी तत्कालीन काळात एम.बी. पाटील कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. मात्र, संबंधित कंत्राटदार कंपनीने विहित मुदतीत या महामार्गाचे बांधकाम पूर्ण न केल्याने सदरचे बांधकाम सन्नी कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आल्याची माहिती आहे. जवळपास ५५ कि.मी. लांबीच्या या राज्य महामार्ग बांधकामांतर्गत जंगलव्याप्त भागातील अंदाजे १७ ते १८ कि.मी. मार्गाचे डांबरीकरण, तर उर्वरित रस्त्याचे सिमेंटीकरण केले जात आहे. त्यानुसार सिमेंटीकरणाचा मार्ग जवळपास ३३ फूट रुंद असल्याची माहिती आहे.
दरम्यान, गत दोन वर्षांपासून या मार्गाचे बांधकाम जलदगतीने सुरू असले तरी शासन, प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षाने या मार्ग बांधकामात मोठ्या प्रमाणात निकृष्ट खनिज साहित्याचा वापर होत असल्याची ओरड आहे.
या मार्गाचे सिमेंटीकरण बांधकामापूर्वी मुरूम काम होताना अक्षरश: मातीमिश्रित मुरमाचा वापर केला जात असल्याची ओरड आहे. दरम्यान, सदर रस्ता बांधकामात मातीमिश्रित मुरमाचा वापर होताना वाहनधारक जनतेला व प्रवासी नागरिकांना धुळीचा त्रास टाळण्यासाठी मुरूम काम झालेल्या रस्त्यावर पाणीदेखील टाकले जात आहे. मात्र, सदर पाणी घातल्यानंतर मातीयुक्त बांधकामाने रस्त्यावर चिखल होऊन वाहनचालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असल्याची बोंब आहे.
याप्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेऊन निकृष्ट खनिजांचा वापर करून सुरू असलेल्या साकोली-वडसा या राज्य महामार्ग बांधकामाची चौकशी करून बांधकामातील दोष दूर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही व उपाययोजना करण्याची मागणी जनतेतून केली जात आहे.