शासकीय बांधकामात फ्लायअॅश विटांचा वापर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 10:58 PM2018-03-04T22:58:44+5:302018-03-04T22:58:44+5:30
शासकीय बांधकामात फ्लायअॅश विटांचाच वापर करावा, असा शासन आदेश असून या निर्णयाचे तंतोतंत पालन करावे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व कार्यालयांना पत्र देण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : शासकीय बांधकामात फ्लायअॅश विटांचाच वापर करावा, असा शासन आदेश असून या निर्णयाचे तंतोतंत पालन करावे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व कार्यालयांना पत्र देण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला आमदार रामचंद्र अवसरे, मुख्य कार्यपालन अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, नगराध्यक्ष सुनील मेंढे, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, मनीषा दांडगे, उपनिबंधक मनोज देशकर, अग्रणी बँक व्यवस्थापक आर.एस. खांडेकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मोहाडी नगरपंचायत क्षेत्राचा पाणी पुरवठा व मलनिस्सारण विकास आराखडयाचे अंदाजपत्रक जीवन प्राधिकरणच्या मार्फत १५ दिवसात तयार करण्यात यावा, असे निर्देश ना. बावनकुळे यांनी दिले. केसलवाडा येथील पाणी पुरवठा समितीचे तत्कालीन अध्यक्ष, सचिव यांनी गैरव्यवहार केल्याची तक्रार केली. या प्रकरणाची क्वालिटी कंट्रोलमार्फत चौकशी करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी दिले. यासोबतच केसलवाडा येथील पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देशही दिले.
खुल्या जागेवर नागरिकांनी केलेले अतिक्रमाण ग्रामपंचायत अधिनियमानुसार कार्यवाही कराव्या अशा सूचना त्यांनी दिल्या. मौजा सातोना येथील जिल्हा परिषद तलावातील अतिक्रमण काढणे व दुरूस्तीसाठी जिल्हा नियोजनमधून ३० लाख रूपयांचा निधी देण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. जिल्हा परिषद लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी सातोना तलावाच्या दुरूस्तीचा प्रस्ताव तातडीने सादर करावा, अशा सूचना ना. बावनकुळे यांनी दिल्या. पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांना शासन सेवेत कंत्राटी तत्वावर नियुक्तीबाबत मंत्रालयस्तरावर २० मार्च रोजी बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
मोहाडीच्या आठवडी बाजारात शासकीय जागेवरील अतिक्रमण तसेच ढोरफोडीबाबत नगरपंचायत मुख्याधिकाºयांने १५ दिवसात कारवाई करून अहवाल सादर करावा, असे त्यांनी सांगितले. मानव वन्यप्राणी संघर्षात जखमी झालेल्या आत्माराम सार्वे यांना तात्काळ मदत देण्यात यावी. भंडारा पालिकेकडे आलेल्या अनुकंपा तत्वावरील अर्जदारास तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त्या देण्यात याव्या, असे निर्देश या बैठकीत देण्यात आले. यावेळी पालकमंत्री यांनी नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण केले. यात प्रामुख्याने जिल्हा परिषद, शिक्षण, आदिवासी, महसूल, महावितरण, पालिका, वन विभागांचा समावेश आहे. नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे व त्यांच्या समस्या विहित मुदतीत सोडविल्या गेल्या पाहिजे यावर पालकमंत्र्यांनी भर दिला. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील पात्र शेतकºयांच्या अर्जातील त्रृटया दुर करणे व नव्याने अर्जासाठी १०, ११ व १२ मार्च रोजी दसरा मैदान भंडारा येथे विशेष शिबिर घेण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. या शिबिरात उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी, बँकेचे अधिकारी उपस्थित राहतील. या शिबीरात कर्जमाफी संदर्भातील सर्व अडचणी सोडविण्यात येतील, असे पालकमंत्री यांनी सांगितले.