वनविभागाच्या जागेतील खड्डे बुजविण्याकरिता राखेचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2022 05:00 AM2022-03-07T05:00:00+5:302022-03-07T05:00:49+5:30
काटेबाम्हणी - टाकला शिवारातील आंधळगाव उपवन कार्यालयांतर्गत येणाऱ्या वनविभागाच्या जागेतील मुरूम खोदलेल्या ठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्डे बुजविण्याकरिता एका वीज कंपनीतील टाकाऊ राखेचा वापर करून खड्डे बुजवित असल्याने जनावरांसाठी पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच शेतकऱ्यांनाही शेती सिंचनापासून वंचित केल्याचा प्रकार घडत आहे. दुसरीकडे काटेबाम्हणी-टाकला शिवारात असलेल्या वनविभागाच्या जागेलगत आंतरराज्यीय प्रकल्प असलेल्या बावनथडी प्रकल्पाचा कालवा गेलेला आहे.
संजय मते
लाेकमत न्यूज नेटवर्क
आंधळगाव : आंधळगाव उपविभाग क्षेत्र कार्यालय व मोहाडी तालुक्यातील टाकला ग्राम पंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या बावनथडी प्रकल्पाच्या कालव्यालगत गट क्रमांक २४७ च्या वनजागेतील खड्डे बुजविण्याकरिता चक्क एका वीज कंपनीतील राखेचा भरणा करण्यात आल्याचे वास्तव समोर आले आहे. बाब अंगलट येणार असल्याने कांद्री वनपरिक्षेत्र अधिकारी व टाकला ग्राम पंचायतीचे पदाधिकारी आणि सचिव यांच्यातील आर्थिक साटेलोटेमुळे वनपरिक्षेत्र अधिकारी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्नात आहेत, तर दुसरीकडे खुद्द वनविभागाने ट्रक व जेसीबी ताब्यात घेतले आहेत.
काटेबाम्हणी - टाकला शिवारातील आंधळगाव उपवन कार्यालयांतर्गत येणाऱ्या वनविभागाच्या जागेतील मुरूम खोदलेल्या ठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्डे बुजविण्याकरिता एका वीज कंपनीतील टाकाऊ राखेचा वापर करून खड्डे बुजवित असल्याने जनावरांसाठी पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच शेतकऱ्यांनाही शेती सिंचनापासून वंचित केल्याचा प्रकार घडत आहे. दुसरीकडे काटेबाम्हणी-टाकला शिवारात असलेल्या वनविभागाच्या जागेलगत आंतरराज्यीय प्रकल्प असलेल्या बावनथडी प्रकल्पाचा कालवा गेलेला आहे. कालव्यालगत असलेल्या खड्डयात राख घातली जात आहे. राख हवेद्वारा उडून कालव्यातील वाहत्या पाण्यात मिसळून जात असल्याने पाणीसुद्धा दूषित होत आहे.
वन विभागाची परवानगी नसताना ग्रामपंचायतीने वीज कंपनीतील कंत्राटदार यांना ग्रामपंचायतीचे ठराव व नाहरकत प्रमाणपत्र देऊन वन विभागाच्या जमिनीवर राख टाकून जेसीपीच्या साहाय्याने सपाटीकरण केले आहे. परिणामी टाकला ग्रामपंचायत वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. जंगलात झाडे लावण्याऐवजी महसूल विभागाच्या जागेवर राख टाकण्यात आली ही गंभीर बाब आहे. राख टाकण्यास कोणी पुढाकार घेतला व ती राख वन विभाग काढणार काय, यामध्ये दोषी असणाऱ्यांवर काही कारवाई होईल काय?, असे अनेक प्रश्न तुर्तास अनुत्तरीत आहे.
जमिनीवर मोठे खड्डे पडल्याने ही जागा पडीत होती. युवकांच्या मागणीनुसार खड्डे बुजवून पटांगण करून देण्याची मागणी होती. कोणत्याही प्रकाराची हानी होणार नाही, या हेतूने खड्डे बुजविले असावेत.
- रामदयाल बिसने, सरपंच टाकला
वन विभागाच्या २४७ या गटामध्ये ग्रामपंचायतीने वीज कंपनीतील एका ठेकेदाराकडून वन विभागाच्या जागेवर राख टाकल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. त्यासंबंधाने चौकशी सुरू आहे.
- केशव राठोड, वनक्षेत्राधिकारी, कांद्री