नाली बांधकामात माती मिश्रीत रेती, गिट्टीचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:34 AM2021-03-16T04:34:47+5:302021-03-16T04:34:47+5:30
संत कबीर चौक येथील उत्कृष्ट स्थितीत असलेली नाली तोडून आता नवीन नाली तयार करण्यात येत आहे. या नालीतून पाण्याचा ...
संत कबीर चौक येथील उत्कृष्ट स्थितीत असलेली नाली तोडून आता नवीन नाली तयार करण्यात येत आहे. या नालीतून पाण्याचा निचरा होईल की नाही, अशी शंका आहे. जुन्या नालीपेक्षा ही नवीन नाली उंचीवर बांधली जात आहे. नाली बांधकामात माती मिश्रित रेती, गिट्टीचा उपयोग केला जात असल्याने, तसेच बारीक व दूर दूर सळाखी असलेली जाळी मध्ये सिमेंट भरल्या जात असून, नाममात्र सळाखीचा वापर केला जात आहे. ही नाली पाच वर्ष तरी टिकेल काय, असा प्रश्न नागरिकांना पडलेला असून, उत्कृष्ट स्थितीत असलेली नाली तोडण्यामागे लॉजिक काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ही नाली एकदम सरळ न बनविता नागाच्या चालीसारखी आडवी, तिरपी तयार करण्यात येत आहे. नाली बांधकामात वापरण्यात येणाऱ्या सिमेंट, रेतीचे प्रमाणसुध्दा योग्य नाही. त्यामुळे नगरपंचायत अभियंत्यांनी सदर कामाचे निरीक्षण करून झालेले निकृष्ट नालीकाम तोडून, दुसऱ्यांदा अंदाजपत्रकाप्रमाणे व मजबूत बांधकाम करण्याचे निर्देश संबंधित ठेकेदाराला द्यावे, होत असलेल्या जनतेच्या पैशांचा अपव्यव थांबवावा, अशी मागणी तेथील नागरिकांनी केली आहे.
सदर कामाची चौकशी करून तक्रारींवर योग्य निर्णय घेण्यात येईल.
रामेश्वर पांडागळे
मुख्याधिकारी, न. पं., मोहाडी.