कॉन्टॅक्ट लेन्स वापरताय, काळजी न घेतल्यास होऊ शकते इजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:34 AM2021-08-29T04:34:09+5:302021-08-29T04:34:09+5:30
तरुणांमध्ये कॉन्टॅक्ट लेन्सची क्रेझ वाढल्याचे दिसते. काही तरुणीही चष्मा लावणे टाळत असून, त्याही कॉन्टॅक्ट लेन्सकडे वळल्या आहेत. कॉन्टॅक्ट लेन्स ...
तरुणांमध्ये कॉन्टॅक्ट लेन्सची क्रेझ वाढल्याचे दिसते. काही तरुणीही चष्मा लावणे टाळत असून, त्याही कॉन्टॅक्ट लेन्सकडे वळल्या आहेत. कॉन्टॅक्ट लेन्स वापरणे सोयीचे व सोपे असले तरी त्यांच्या स्वच्छतेची काळजी न घेतल्यास किंवा त्यांचा वापर कशा प्रकारे करावा, या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास डोळ्यांना इजादेखील होऊ शकते. जंतू सगळीकडे असतात. मात्र, डोळ्यासारख्या नाजूक अवयवास आता असे इन्फेक्शन अतिशय महागात पडू शकते. तेव्हा काळजी घेणे गरजेचे आहे. कॉन्टॅक्ट लेन्स लावल्यानंतर योग्य काळजी घेतली नाही, तर धूसर दिसायला लागते. कॉन्टॅक्ट लेन्स चांगल्या दर्जाच्या घ्यायला हव्यात, तसेच काही लेन्स एक महिना वापरल्यानंतर दुसऱ्या वापराव्या लागतात. त्यात नवीन लेन्सचे निर्जंतुकीकरण केले असल्याने डोळ्यांना इजा होत नाही. लेन्स काढून डबीमध्ये ठेवायला हव्यात. त्यासाठी दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.
कोट
कॉन्टॅक्ट लेन्स वैद्यकीय सल्ल्यानुसार घ्याव्यात. आम्ही ज्याला कॉन्टॅक्ट लेन्स द्यायच्या त्याची आधी केरेटोमेट्री करतो. त्याला काही ॲलर्जी आहे काय, डोक्यावर किंवा डोळ्यांच्या पापण्यांवर कोंडा येत असेल, तर लेन्स वापरायचे की नाही, हे रुग्णानुसार ठरविण्यात येते. आधी ट्रायल लेन्स देण्यात येतात. त्यानंतर लेन्स वापरण्याचे तीन ते चार दिवस प्रशिक्षण देण्यात येते. लेन्स लावताना हात स्वच्छ धुवायला हवेत. डॉक्टरांनी दिलेल्या सोल्युशनमध्ये लेन्स ठेवायला हव्यात. लेन्स जास्तीत जास्त सहा ते सात तास लावाव्यात. कॉन्टॅक्ट लेन्स लावण्याची व काढण्याची पद्धत डॉक्टरांकडून समजून घेणे आवश्यक आहे.
-डॉ. आशा लांजेवार, नेत्रतज्ज्ञ, भंडारा
बॉक्स
चष्म्याला करा बाय-बाय
- अगदी कमी वयातच अनेकांना आजकाल चष्मा लागतो. त्यामुळे अशा मुलांना हिणवले जाते. मात्र, चष्म्याला पर्याय कॉन्टॅक्ट लेन्स आहेत.
-अनेक जण छान दिसावं म्हणूनदेखील कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करताना दिसत आहेत.
- मात्र, त्यांचा वापर करताना आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे. लेन्सच्या सुरक्षित वापरामुळे अनेकांनी चष्म्याला बाय-बाय केले आहे.
बॉक्स
...ही घ्या काळजी
- लेन्स वापरण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे फार आवश्यक आहे. त्या आपल्या डोळ्यांना सूट होतात काय, कोणत्या प्रकारच्या लेन्स वापराव्यात हे जाणून घ्यावे.
- लेन्स घालून झोपणे टाळावे, रात्री झोपताना आठवणीने डोळ्यातील लेन्स योग्य त्या केसमध्ये काढून ठेवाव्यात. लेन्स सुरक्षित आणि जंतुविरहित ठेवण्यासाठी लेन्स केसचा वापर करावा.
- डोळ्यात लेन्स असताना अंघोळ करणे, चेहरा धुणे, पोहायला जाणे, पावसात भिजणे टाळावे.