ऊठसूठ व्हॉट्सअँप, स्टेटस पाहताय, मेंदूत होईल केमिकल लोच्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 02:26 PM2024-05-07T14:26:02+5:302024-05-07T14:27:00+5:30
Bhandara : वेळीच डॉक्टरांशी चर्चा करण्याचे तज्ज्ञांचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मोबाइलच्या आहारी जाणे, व्हॉट्सअँप, स्टेटस वारंवार पाहण्याची सवय अनेकांना जडल्याचे वैद्यकीय तपासणीतून समोर येत आहे. व्हॉट्सअँप, स्टेटस वारंवार पाहण्याचा मोह आवरत नसेल तर वेळीच डॉक्टरांशी चर्चा करा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला.
मोबाइलचे जसे चांगले फायदे आहेत, तसेच काही दुष्परिणामदेखील आहेत. मोबाइलच्या जास्त वापरामुळे अनेक समस्या समोर येत आहेत. त्यात मानसिक आरोग्यावर परिणाम अधिक होत असल्याचे दिसून येते. मोबाइलचा अतिवापर डोळ्यांसह मेंदूवरही परिणाम करत आहे. याबरोबरच आता व्हॉट्सअँप, स्टेटस वारंवार पाहण्याची सवयदेखील अनेकांना जडली आहे. झोपण्यापूर्वी किंवा झोपेतून उठल्याबरोबर अनेक जण मोबाइल हाती घेऊन व्हॉट्सअँप, स्टेटस पाहतात. हा प्रकार दैनंदिन बनला असेल तर मानसिक आजार जडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे तज्ज्ञ सांगतात.
वारंवार मोबाइल पाहणे घातक
वारंवार मोबाइल पाहणे, मोबाइलशिवाय कशातच मन न लागणे ही मानसिक आजाराची लक्षणे मानली जात आहेत. वारंवार मोबाइल पाहणे घातक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.
मोबाइल वापरताना काय काळजी घ्याल?
शक्यतो महत्त्वाचे काम असेल तरच मोबाइलचा वापर करावा. रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्याउठल्या मोबाइल हाती घेऊ नये. कुटुंबातील लहान मुलांसमोर मोबाइलचा जास्त वापर करू नये. मानसिक आरोग्याचा विचार करून मोबाइलवर नियंत्रण ठेवणे शिकावे.
'नो-मोबाइल डे' पाळा
मोबाइलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेकांना मोबाइलची सवय जडली आहे.
तासन्तास मोबाइलमध्ये गुंतून राहण्यामुळे संवादाची दरी खूपच वाढत आहे.
मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी व प्रत्यक्ष संवाद वाढविण्यासाठी आठवड्यातून एक दिवस 'नो मोबाइल डे' हवा.